घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 12:43 IST2025-11-06T12:42:44+5:302025-11-06T12:43:31+5:30
बरेलीच्या सुभाष नगर भागात हा प्रकार घडला. याठिकाणी आय स्पेशलिस्ट डॉक्टर कुटुंबासह राहत होते

घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
बरेली - उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एका डॉक्टरसोबत भयानक प्रकार घडला. एका डॉक्टरच्या पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी मिळून पतीचे हातपाय बांधले आणि चाकू दाखवून कागदावर स्वाक्षरी घेतली. पत्नीच्या प्रियकराला नशेचं व्यसन होते, त्यामुळे त्याच्या याच सवयीमुळे डॉक्टरचा जीव वाचला. डॉक्टर कसे बसे घरातून बाहेर पडले आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. बरेलीच्या उच्चभ्रू वस्तीत डॉक्टर आणि त्यांचे कुटुंब राहत होते.
बरेलीच्या सुभाष नगर भागात हा प्रकार घडला. याठिकाणी आय स्पेशलिस्ट डॉक्टर कुटुंबासह राहत होते. त्यांची पत्नी शिखा आणि तिचा प्रियकर सौरभ सक्सेना या दोघांनी मिळून २८ ऑक्टोबरला त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पत्नीने दुधातून पतीला झोपेची औषधे दिली. त्यानंतर जेव्हा पती बेशुद्ध झाला तेव्हा शिखा आणि प्रियकर सौरभने मिळून त्याचे हात पाय रस्सीने बांधले. त्यानंतर शुद्धीवर येताच या दोघांनी त्याच्या छातीवर चाकू ठेवून धमकावले. दोघांनी पतीकडून चेकबुक आणि इतर कागदपत्रांवर सह्या करून घेतल्या असा आरोप आहे.
नेमकं याच वेळी दारू पिण्याच्या सवयीमुळे सौरभने घरात जास्त प्रमाणात दारू प्यायली होती. तो इतका नशेत धुंद होता की डॉक्टरचा गळा दाबण्याचा प्रयत्न करताना तो स्वत: बेशुद्ध होऊन खाली पडला. त्यात डॉक्टरची पत्नी बाथरूमला गेली होती. संधी मिळताच बंधक असलेल्या डॉक्टरांनी कशीतरी रस्सी उघडली आणि घराबाहेर जात मदतीसाठी आरडाओरड केला. यावेळी घाबरलेली पत्नी तिच्या प्रियकराला घेऊन फरार झाली. त्यानंतर डॉक्टरांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
दरम्यान, पोलीस घटनास्थळी आले तेव्हा आरोपींनी घरातील सीसीटीव्ही बंद ठेवले होते हे तपासात पुढे आले. परंतु शेजाऱ्यांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अनेक पुरावे पोलिसांच्या हाती लागले. सध्या या प्रकरणात पोलिसांनी पीडित डॉक्टरचा जबाब नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेतील आरोपी पत्नी आणि तिचा प्रियकर सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.