डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे मारेकरी जेरबंद, प्रेयसीच्या हत्येचं गुढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 05:21 AM2022-01-26T05:21:57+5:302022-01-26T05:33:05+5:30

अनैतिक संबंधांतून प्रेयसीच्या पतीच्या हत्येचे गूढ उकलले, तिघे अटकेत

Doctor's prescription arrests killer, unravels murder mystery | डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे मारेकरी जेरबंद, प्रेयसीच्या हत्येचं गुढ उकललं

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनमुळे मारेकरी जेरबंद, प्रेयसीच्या हत्येचं गुढ उकललं

Next

भिवंडी : तालुक्यातील कांबे परिसरात रस्त्यालगतच्या पुलाखाली मृतदेह गोणीत बांधून फेकलेल्या हत्येचा डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनवरून शोध लावून तिघांना निजामपुरा पोलिसांनी अटक केली. ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी मंगळवारी दिली.
२० जानेवारी रोजी कांबे पॉवर हाउस जुनादुरखी रस्त्यावरील रूपाला ब्रिजखाली रक्ताने माखलेल्या एका गोणीमध्ये मृतदेह आढळला होता. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. सुरुवातीला या मयताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांनी पोलीस पथके बनवत तपास सुरू केला होता. तपासात मृतदेहाच्या शर्टाच्या खिशात अर्धवट फाटलेला डॉक्टर प्रिस्क्रिप्शनचा कागद सापडल्यानंतर या आधारावरून तपासाची दिशा ठरवून मेडिकल दुकानदार यांच्याकडून प्रिस्क्रिप्शन कोणत्या भागातील डॉक्टरची आहे याचा शोध घेत असतानाच पोलिसांना एक महिला आपल्या पतीचा शोध घेत असल्याचे समजले. तिला बोलावून मृतदेहाची ओळख पटवली असता, तो मृतदेह अरमान शेर अली शाह (वय ४५ ) याचा असल्याचे स्पष्ट झाले. 

यानंतर त्याची हत्या कोणी केली, याबाबत शोध घेत असताना हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीचे ती काम करत असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या मोहम्मद सलमान अब्दुल मुकीद शेख याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. यावरून मयत व्यक्तीने ते काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन मालकास याबाबत सांगून सलमान यास जाब विचारला होता. त्याचा राग मनात ठेवून त्याने सहकारी तस्लिमा हलीम अन्सारी व चांदबाबू ऊर्फ बिलाल सईद अन्सारी यांच्या मदतीने अरमान शेर अली शाह यास फसवून नेऊन त्यावर हल्ला करून त्याची निर्घृण हत्या केली.

या घटनेत कोणताही पुरावा नसताना प्रिस्क्रिप्शन वरून मृतदेहाची ओळख पटवत आरोपींना अवघ्या ४८ तासांत अटक केली. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे.

Web Title: Doctor's prescription arrests killer, unravels murder mystery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.