नागपुरात टपालाने दिला तलाक : नवरोबाविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 00:21 IST2020-01-21T00:19:15+5:302020-01-21T00:21:39+5:30
पत्नीला टपालाने तलाक (घटस्फोट) देणाऱ्या नवरोबाविरुद्ध तहसील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नागपुरात टपालाने दिला तलाक : नवरोबाविरुद्ध गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पत्नीला टपालाने तलाक (घटस्फोट) देणाऱ्या नवरोबाविरुद्ध तहसील ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मोईन अब्दुल करीम नूरानी (वय ३७) असे आरोपीचे नाव आहे. तो गुजरातमधील सूरतचा रहिवासी आहे.
मोमिनपुऱ्यातील तरुणीसोबत मोईनचा १४ वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनीच मोईनने पत्नीला छळणे सुरू केले. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मोईनविरुद्ध सूरत पोलिसांनीही प्रकरण दाखल केले होते. मात्र, त्याच्याकडून छळ कमी झाला नाही. त्यामुळे पत्नीने आपल्या मुलीला घेऊन नागपूर गाठले. येथे ती आपल्या माहेरी राहत आहे. आरोपी मोईनने काही दिवसांपूर्वी तिला गुजराती भाषेत पत्र पाठवले. त्यात तीनवेळा तलाक लिहिले आहे. ते पाहून पत्नीने तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर सोमवारी रात्री मोईनविरुद्ध मुस्लिम वूमेन प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज अॅक्ट २०१९ च्या नुसार गुन्हा दाखल केला. शहरात अशाप्रकारे ट्रिपल तलाक तहसील ठाण्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा होय. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे तोंडी ट्रिपल तलाक देणाऱ्या एका नवरोबाविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.