जेवणाची पार्टी जीवावर बेतली : भरधाव जिप्सी उलटून एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 19:45 IST2020-02-29T19:42:32+5:302020-02-29T19:45:05+5:30
वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले.

जेवणाची पार्टी जीवावर बेतली : भरधाव जिप्सी उलटून एक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (हिंगणा) : वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाब्यावर पार्टी करायला गेलेल्या युवक-युवतींची जिप्सी गौसी मानापूर शिवारात उलटली. यात एका युवकाचा मृत्यू झाला तर काही जण किरकोळ जखमी झाले. यश राजू राहाटे (२३) रा.गोपालनगर, नागपूर असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. यशचे वडील राजू रहाटे नागपूर महापालिकेच्या झोपडपट्टी विकास प्राधिकरण (एसआरए) विभागात अभियंता आहेत.
प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी रात्री नागपूर येथील ५ युवक आणि २ युवती जिप्सी क्रमांक एम.एच.४०/बी.ई.०००९ ने वर्धा रोडवरील एमसीसीपी फूड ढाबा येथे पार्टी करण्यासाठी (जेवणासाठी) गेले होते. येथून परत येत असताना गौसी मानापूर शिवारात चालकाचे जिप्सीवरील नियंत्रण सुटले. यात यश रहाटे हा गंभीर जखमी झाला. त्याला वर्धा रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यात डॉक्टरांनी तपासअंती त्याला मृत घोषित केले. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीनंतर यशच्या पार्थिवावर शनिवारी अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले. यात अविनाश अय्यर (२४), विनायक नगर, आनंद गायधने (२४) रा. गोपाल नगर, अंकित तुपकर (२४) रा.वर्धमाननगर, हर्षल ठवरे (२४) रा. मानेवाडा आणि दोन युवतींचा समावेश आहे. त्यांना नजीकच्या विवेकानंद हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हर्षल ठवरे हा जिप्सी चालवित होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात अरविंद घिये करीत आहेत.