डिजिटल अरेस्ट : तुमच्या कुटुंबाला धोका, कॉल बंद करून कुठेही जाऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 07:35 IST2025-01-12T07:34:42+5:302025-01-12T07:35:06+5:30

जळगावात डॉक्टरला ३१ लाख, गोंदियात शिक्षकाला १३ लाखांचा गंडा

Digital arrest: Danger to your family, don't go anywhere without turning off the calls | डिजिटल अरेस्ट : तुमच्या कुटुंबाला धोका, कॉल बंद करून कुठेही जाऊ नका

डिजिटल अरेस्ट : तुमच्या कुटुंबाला धोका, कॉल बंद करून कुठेही जाऊ नका

जळगाव/गोंदिया : कुटुंबाला धोका व अटकेची धमकी दाखवत सायबर भामट्यांनी जळगावमध्ये एका डॉक्टरला आणि गोंदियामध्ये एका शिक्षकाला लाखो रुपयांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे.  अटकेपासून वाचण्यासाठी पैशांची मागणी करत जळगावातील डॉक्टरची तब्बल ३१ लाख ५६ हजार ६४ रुपयांची फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवृत्तीनगरातील ५८ वर्षीय डॉक्टरसोबत ३१ डिसेंबर २०२४ ते ९ जानेवारी २०२५ दरम्यान राधिका नावाची महिला तसेच राजेश प्रधान व मुकेश बॅनर्जी या तीन जणांनी संपर्क साधला. त्यांना एक मोबाइल क्रमांक सांगून तो तुमच्या नावे आहे व त्यावरून त्रास देण्यासह महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवल्याचे सांगण्यात आले. यावरून तुमच्याविरुद्ध बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, डॉक्टरांना सर्व बनावट कागदपत्रं पाठविण्यात आले व व्हिडीओ कॉल बंद करून कोठेही जायचे नाही, तुम्हाला अटक करण्यात येईल, अशी भीती दाखवत डॉक्टरांकडून वेळोवेळी ३१ लाख ५६ हजार ६४ रुपये ऑनलाइन स्वीकारण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्षकाला तीन दिवस घरात अरेस्ट  
गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध येथील जवाहर नवोदय विद्यालयातील शिक्षक भोजलाल रामलाल लिल्हारे यांना तुझ्यावर मुंबई-ठाण्यात एफआयआर दाखल आहे. तू डिजिटल अरेस्ट हो, असे सांगून त्यांच्याजवळून १३ लाख ४४ हजार रुपये वसूल करण्यात आले.
आरोपीवर नवेगावबांध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर लुटारूंच्या जाळ्यात अडकलेल्या लिल्हारे यांनी स्वत:ला तीन दिवस घरातीलच खोलीत डांबून ‘डिजिटल अरेस्ट’सुद्धा दिला आहे.

तुमच्या सर्व खात्यांची माहिती द्या, हे कोणाला सांगू नका 
लिल्हारे यांना २६ डिसेंबरला एक व्हॉट्सॲप कॉल आला. पीओ प्रकाश अग्रवाल क्राईम ब्रांच मुंबईवरून बोलतो, असे सांगत त्याने मुंबई-ठाणे येथे आपल्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
तुमच्या नावावर कॅनरा बँकेत खाते काढून नरेश गोयल नावाच्या व्यक्तीने दोन कोटी रुपयांचा त्या खात्यातून फ्राॅड केला आहे. या प्रकरणात आपण १४८वे संशयित व्यक्ती आहात, असे सांगून त्याचे २० टक्के कमिशन आपल्याला दिले आहे.
त्यामुळे तुम्ही तुमच्या सर्व खात्यांची माहिती द्या. ही गोष्ट कुणाला सांगू नका, अन्यथा आपल्या कुटुंबाला जीवाचा धोका होईल, असे सांगून त्यांच्याजवळून तीन दिवसात १३ लाख ४४ हजार रुपये लुटले.

Web Title: Digital arrest: Danger to your family, don't go anywhere without turning off the calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.