उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जाऊबाईसोबत होणाऱ्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका महिलेने तिच्या सासरच्या संपूर्ण कुटुंबीयांना संपवण्यासाठी भयंकर कट रचला. करारी पोलीस स्टेशन परिसरातील मलकिया बाझा खुर्रम गावात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. घरातील सुनेने पिठात सल्फास मिसळून पती, जाऊबाई आणि कुटुंबातील इतर सदस्यांना विष देण्याचा कट रचला.
मंजू देवीला चपात्या बनवताना पीठातून एक वेगळाच वास येत असल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. तिला पीठात काहीतरी मिसळल्याचा संशय आला. जेव्हा तिने कुटुंबातील इतरांना हे सांगितलं आणि पीठ नीट पाहिलं तेव्हा धक्काच बसला. कुटुंबाने सून मालती देवीला विचारलं तेव्हा तिने पिठात सल्फास मिसळल्याचं सांगितलं. संपूर्ण कुटुंबाला एकत्र मारण्यासाठी असं केल्याचं सांगितलं.
मालती देवीचे तिच्या सासरच्यांशी, विशेषतः तिच्या जावेशी अनेकदा वाद होत असत. दररोजच्या भांडणांना आणि मानसिक छळाला कंटाळून मालतीने तिचे वडील कल्लू प्रसाद आणि भाऊ बजरंगी यांच्यासोबत हा कट रचला. त्यांनी अन्नात विष मिसळून संपूर्ण कुटुंबाला मारण्याचा कट रचला. मालतीचा पती ब्रिजेश कुमार याने तात्काळ करारी पोलीस ठाण्यात या संपूर्ण घटनेची माहिती दिली. पोलिसांनी कारवाई केली आणि महिलेसह तिचे वडील आणि भाऊ यांना ताब्यात घेतले. सध्या तिघांचीही चौकशी सुरू आहे.
अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी) राजेश कुमार सिंह यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ब्रिजेश कुमार यांच्या तक्रारीवरून, हत्येचे नियोजन करणे, गुन्हेगारी कटात सहभागी होणे इत्यादी कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी विषारी पीठ जप्त केले आहे आणि ते चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.