नाशिक : एक महिन्यापासून फरार असलेला देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार व मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ गोटु देवाजी वाघ (रा. गिरणारे, ता. देवळा ) याने मंगळवारी रात्री कळवण पोलिसांपुढे शरणागती पत्करली. पोलिसांनी बुधवारी (दि.१७) वाघ यास कळवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुख्य सूत्रधारच आता स्वत:हून हजर झाल्याने घोटाळ्यातील अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुय्यम निबंधक माधव महाले यांनी १३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गोटु वाघ, बापू वाघ व इतर साथीदारांवर देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोन्ही संशयित आरोपी फरार झाले होते. गत सप्ताहात शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेणारा बापू रामचंद्र वाघ ( रा. झाडी, ता. मालेगाव ) यास देवळा पोलिसांनी अटक केली होती; मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत ऊर्फ गोटू वाघ हा एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्या जामीन अर्जावर १६ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. तेथे जामीन न मिळाल्याने अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे.प्रश्नांची हाेणार उकलमुद्रांक विक्रेता पोलिसांच्या स्वाधीन झाल्याने त्याला दुय्यम निबंधक कार्यालयातून जुना मुद्रांक व बनावट दस्तऐवज प्रमाणित करून त्याची सत्यप्रत काढून देण्यास, तसेच बनावट मुद्रांक बनवण्यास कुणी मदत केली, अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यास मदत होणार आहे, तसेच बनावट दस्तऐवज व सत्यप्रत याद्वारे शेतजमीन परस्पर हडप करण्याच्या प्रकरणात झालेल्या आर्थिक देवाण-घेवाणीचाही उलगडा होणार आहे.
देवळा मुद्रांक घोटाळा: मुख्य सूत्रधार अखेर शरण, २० मार्चपर्यंत कोठडी; मोठे मासे सापडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 08:10 IST