खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:56 IST2025-08-05T12:55:32+5:302025-08-05T12:56:19+5:30
एका २० वर्षीय तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.

फोटो - आजतक
दिल्लीमध्येगुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहेत. जहांगीरपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी ब्लॉकमध्ये एका २० वर्षीय तरुणाने १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलगी तिच्या घराजवळील डॉक्टरांच्या दवाखान्यात गेली होती. तब्येत बिघडल्यामुळे ती तिच्या एका मैत्रिणीसोबत औषध घेण्यासाठी गेली होती.
अचानक २० वर्षीय आर्यन त्याच दवाखान्यात पोहोचला. आर्यनने मुलीवर चार गोळ्या झाडल्या आणि पळून गेला. गोळ्यांचा आवाज ऐकून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाची माहिती जहांगीरपुरी पोलीस ठाण्याला देण्यात आली. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. मुलीला जखमी अवस्थेत बाबू जगजीवन राम रुग्णालयात नेण्यात आलं होतं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.
मुलगी जहांगीरपुरीच्या डी ब्लॉकमध्ये तिच्या कुटुंबासह राहत होती. २० वर्षीय आर्यन देखील तिच्या घरापासून थोड्या अंतरावर राहतो. दोघांची मैत्री होती आणि त्यानंतर काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता असं सांगितलं जात आहे.
मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण अल्पवयीन मुलीला सतत त्रास देत होता आणि हे एकतर्फी प्रेमप्रकरण आहे. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे.