नवा ट्विस्ट! "मनिकाच्या वडिलांना दिले १.६५ कोटी"; पुनीत खुरानाच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 15:06 IST2025-01-01T15:06:12+5:302025-01-01T15:06:35+5:30
पुनीतचं लग्न मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या मनिका पाहवासोबत झालं होतं. सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं, मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले.

नवा ट्विस्ट! "मनिकाच्या वडिलांना दिले १.६५ कोटी"; पुनीत खुरानाच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप
दिल्लीतील मॉडेल टाऊन भागातील कल्याण विहारमध्ये पुनीत खुराना नावाच्या व्यक्तीने आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पुनीतचं २०१६ मध्ये लग्न झालं होतं आणि घटस्फोटाची केस सुरू होती. पुनीत पत्नीमुळे त्रस्त असल्याचा पुनीतच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पुनीतचं पत्नीशी फोनवर शेवटचं बोलणं झालं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, पुनीतचं लग्न मॉडेल टाऊनमध्ये राहणाऱ्या मनिका पाहवासोबत झालं होतं. सुरुवातीला सर्व काही ठीक चाललं होतं, मात्र त्यानंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. दोन वर्षे पुनीत आई-वडिलांशिवाय पत्नीसोबत राहत होता, पण त्यानंतर पुनीत घरी आला आणि मनिका तिच्या आई-वडिलांच्या घरी गेली. दोघांनी कोर्टात घटस्फोटाचा दावाही केला होता. पुनीतच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, मनिका आणि तिच्या कुटुंबीयांनी पुनीतला इतका त्रास दिला की त्याने आत्महत्या केली.
पुनीत हा मॉडेल टाऊन परिसरात बेकरी चालवायचा, ३१ डिसेंबरला पहाटे ३ वाजता तो घरी पोहोचला आणि खोलीत झोपला. दुपारी १२ वाजेपर्यंत खोली न उघडल्याने आईला काळजी वाटली. फोन केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर तिने पतीला फोन केला. सायंकाळी ३.३० च्या सुमारास दरवाजा तोडला असता आत पुनीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पुनीतला तात्काळ रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
पुनीतच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, आत्महत्या करण्यापूर्वी पुनीतने एक तासाचा व्हिडीओ बनवला होता. पुनीतचा पत्नीसोबत दोन वर्षांपासून घटस्फोटाचा सुरू होता. व्हिडिओमध्ये त्याने पत्नी आणि तिच्या पालकांकडून होणाऱ्या छळाची संपूर्ण माहिती दिली आहे. पुनीतच्या आईचं म्हणणं आहे की, मला आता न्याय हवा आहे, माझा मुलगा गेला आहे.
पुनीत आणि मनिका यांचं कुटुंबीय एकमेकांना लग्नापूर्वी ओळखत होतं. पुनीतच्या वडिलांचा दावा आहे की, मालमत्ता विकून मिळालेले १ कोटी ५६ लाख रुपये त्यांनी मनिकाच्या वडिलांना कर्ज म्हणून दिले होते. लग्नानंतर पुनीत आणि मनिकाने एक कॅफे सुरू केला, पण काही दिवसांनी तो बंद झाला. या मालमत्तेतील काही पैसे कॅफेमध्येही वापरले गेले. पुनीत आपल्या कुटुंबासह राहत होता ते घर मनिकाच्या नावावर आहे. आता पोलीस या मालमत्तेच्या वादाचाही तपास करत आहेत.