घरात एकटी कमावती होती दिल्ली दुर्घटनेतील 'ती' तरुणी, कुटुंबीय धक्क्यानं बिथरले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 22:10 IST2023-01-01T22:09:14+5:302023-01-01T22:10:50+5:30
दिल्लीच्या सुल्तानपुरी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका २३ वर्षीय तरुणीला कारमधून नववर्षाच्या पार्टीसाठी भरधाव वेगानं जाणाऱ्या चौघांनी उडवलं

घरात एकटी कमावती होती दिल्ली दुर्घटनेतील 'ती' तरुणी, कुटुंबीय धक्क्यानं बिथरले!
नवी दिल्ली-
दिल्लीच्या सुल्तानपुरी परिसरात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. एका २३ वर्षीय तरुणीला कारमधून नववर्षाच्या पार्टीसाठी भरधाव वेगानं जाणाऱ्या चौघांनी उडवलं आणि फरफटत नेलं. यात तरुणीचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या तरुणीला दोन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. थोरल्या बहिणीचं लग्नं झालं आहे. अपघातात मृत्यू झालेली तरुणी घरात एकटी कमावणारी होती. तिच्या आईला किडनीचा आजार आहे. दोन्ही किडनी फेल झाल्या आहेत.
धक्कादायक घटना! 23 वर्षीय तरुणीला कारने उडवलं अन् 4KM फरफटत नेलं; जागीच मृत्यू
समोर आलेल्या माहितीनुसार अपघातात मृत्यू झालेली तरुणीच घराची आर्थिक आधार होती. तिच्याच पगारावर घर चालत होतं. ती एका इव्हेंट कंपनीमध्ये काम करत होती. ती आता या जगात नाही हे पचवणंच कुटुंबीयांना खूप कठीण जात आहे. एक भाऊ १३ वर्षांचा तर दुसरा ९ वर्षांचा आहे. वडिलांचं ८ वर्षांपूर्वीच निधन झालं आहे. तर मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे. या घटनेनंतर तिच्या आईनं फक्त पोलीस ठाण्याचे डीसीपी यांच्याशी बातचित केली आहे. इतर कुणाशीही बोलण्याच्या मनस्थितीत त्या सध्या नाहीत.
परिचयातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ३१ डिसेंबरच्या संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास तरुणी बाहेर पडली होती. इव्हेंट कंपनीचं काहीतरी काम आहे सांगून ती घरातून निघाली होती. रात्री ९ वाजताच्या सुमारास तिनं घरी फोनही केला होता आणि घरी रात्री उशिरा येणार असल्याचं कळवलं होतं. कुटुंबीयांनी तिला रात्री १० वाजता फोन केला होता. पण तिचा फोन बंद लागत होता. थेट सकाळी ८ वाजता दिल्ली पोलिसांकडून अपघाताची माहिती कुटुंबीयांना मिळाली.
भरधाव वेगात कारनं तिला चक्क ४ किमी फरफटत नेलं
राजधानी दिल्लीत नववर्षाच्या सेलिब्रेशनमध्ये अंगावर काटा आणणारी घटना घडली. एका तरुणीचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. सुल्तानपुरी ठाणे हद्दीतील कंझावाला परिसरात पाच मुलांनी तरुणीला कारनं धडक दिली आणि तिला जवळपास ४ किमी अंतरापर्यंत फरफटत नेलं. यात तरुणीचा मृत्यू झाला. तरुणी तिच्या स्कूटीवरुन घरी परतत होती. याच दरम्यान भरधाव वेगात पार्टीच्या धुंदीत कार चालवणाऱ्या या पाच मुलांनी तिला धडक दिली होती.
कारनं ४ किमी फरफटत नेल्यानं तरुणीच्या शरीरावरचे सगळे कपडे फाटून गेले. तिच्या शरीराला अनेक ठिकाणी जखमा झाल्या आणि घटनास्थळावरच तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या अपघाताचा जो फोटो समोर आला आहे तो इतका भयंकर आहे की कुणाचीही तो फोटो पाहण्याची हिंमत होत नाहीय. तरुणीचं संपूर्ण शरीर गंभीर जखमांनी भरलं आहे. नराधमांनी तिला इतकं फरफटत नेलं की तिच्या शरीरावर एकही कपडा शिल्लक राहिला नाही.