चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 22:50 IST2025-07-14T22:49:27+5:302025-07-14T22:50:44+5:30
या टोळीने नागपुरात चेन स्नॅचिंगचे सहा आणि वाहन चोरीचे चार गुन्हे केले असल्याची बाब उघडकीस आली

चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: दिल्लीहून नागपुरात येऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील तीन सदस्यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने ही कारवाई केली. या टोळीने नागपुरात चेन स्नॅचिंगचे सहा आणि वाहन चोरीचे चार गुन्हे केले असल्याची बाब उघडकीस आली आहे.
अक्षय विष्णुदत्त शर्मा (२९, रा. पूर्व सागरपूर), रोहितकुमार सुरेश कुमार (२७, द्वारका, सेक्टर १) आणि रोहित पशुपतीनाथ गुप्ता (२७, सागरपूर, दिल्ली) अशी आरोपींची नावे आहेत. त्याचा साथीदार रोहन टिके फरार आहे. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. रोहन हा वर्ध्याचा रहिवासी आहे. तो दिल्लीत स्थायिक झाला आहे. तो पूर्वी अक्षयसोबत एका खाजगी कंपनीत काम करायचा. अक्षयवर दरोडा आणि चोरीसह २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. तो बऱ्याच काळापासून गुन्हेगारीत सक्रिय आहे. रोहनने अक्षय आणि रोहित कुमारला नागपूरमध्ये दागिने घालणाऱ्या भरपूर महिला सापडतील असे सांगितले. यानंतर आरोपींनी नागपुरात गुन्हा करण्याचा कट रचला.
ते दिल्लीहून रेल्वेने नागपूरला यायचे. त्यानंतर ते अगोदर मोटारसायकल चोरायचे व त्यावरून न स्नॅचिंग करायचे. नंतर, ते मोटारसायकल तिथेच सोडून रेल्वेने दिल्लीला परतायचे.धंतोली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना पोलिस रेल्वे स्थानकावर पोहोचले. आरोपी तेलंगणा एक्सप्रेसने गेल्याची बाब समोर आली. पोलिसांनी नागपूर, इटारसी, भोपाळ, झाशी, ग्वाल्हेर, आग्रा आणि दिल्ली येथील स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. दिल्ली स्टेशनबाहेरील सीसीटीव्हीवरून आरोपी ज्या ऑटो रिक्षातून आले होता त्याच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. आधारावर अक्षय आणि रोहितला पकडण्यात आले. त्यांनी गुप्ताला चोरीचे दागिने विकल्याबद्दल सांगितले. पोलिसांनी गुप्ता यालाही ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
आरोपींनी नागपूरसह अनेक शहरांमध्ये गुन्हे केले आहेत. ही कारवाई डीसीपी राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश सांगळे आणि त्यांच्या पथकाने केली. आरोपींनी धंतोली, सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन, तर बुटीबोरी व अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी एक चेनस्नॅचिंग केली. तर सिताबर्डी व धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रत्येकी दोन मोटारसायकल लंपास केल्या होत्या.