शेड्याळ मारहाणप्रकरणातील तरुणाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 15:21 IST2022-08-14T15:21:02+5:302022-08-14T15:21:17+5:30
वडिलांसाठी आणलेली दारुची बाटली त्यांनी चव्हाण बंधुंकडे मागितली.

शेड्याळ मारहाणप्रकरणातील तरुणाचा मृत्यू
जत : शेड्याळ (ता. जत) येथे दारुची बाटली देण्याच्या कारणातून झालेल्या मारहाणीतील जखमी बादल रमेश चव्हाण याचा शनिवारी पहाटे सांगलीतील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे शेड्याळमध्ये तणावाचे वातावरण आहे. या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात असुन पोलिसांनी चाैघाना यापुर्वीच अटक केली आहे.
शुक्रवार दि. १२ रोजी रात्री बादलसह त्यांचे दोन भाऊ आकाश व सागर हे घरी होते. यावेळी शेडयाळचे माजी सरपंच अशोक पाटील, चंद्रकांत गुगवाड, सुरेश हावगोंडी, सुरेश देवर्षी, मास्तर तेली व अन्य काहीजण त्यांच्या घरी आले. वडिलांसाठी आणलेली दारुची बाटली त्यांनी चव्हाण बंधुंकडे मागितली.
एका बाटली दिल्यानंतर आणखी एक बाटली देण्याची मागणी त्यांनी केली असता. चव्हाण बंधुंनी नकार दिला. यातुन वाद होऊन संबंधितांनी तिघांना मारहाण करत घरावर दगडफेक करुन साहित्य जळुन खाक केले. या मारहाणीत बादल चव्हाण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी सांगलीतील रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी पहाटे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.