मुंब्रा : अॅलोपथी औषधोपचाराचे प्रशिक्षण न घेता रुग्णावर उपचार करु न त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दाऊद खान (४९, रा. स्टार कॉलनी, अमृतनगर, मुंब्रा) याला शिळ-डायघर पोलिसांनी अटक केली.मित्राच्या हळदी समारंभातून मध्यरात्री परतलेल्या अंकीत पाटील या तरुणाच्या पाठीत आणि पोटात दुखू लागल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे २४ एप्रिल रोजी उपचारांसाठी तो आचारगल्लीतील खान याच्या रुग्णालयात गेला होते. युनानी औषधोपचाराचे शिक्षण घेतलेल्या खान याने अंकितची प्रकृती नेमकी कशामुळे ढासळली याची कुठलीही वैद्यकीय तपासणी न करता त्याला दोन तासात तीन इंजेक्शन दिली. यामुळे त्याची प्रकृती अधिक खालावल्याने तो दवाखान्यातच चक्कर येऊन खाली पडला. पुढील उपचारांसाठी त्याला मुंब्र्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला याची चौकशी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या पाच तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने डॉ. खान याने निष्काळजीपणे, चुकीचे उपचार केल्यामुळे अंकितचा मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. त्यानंतर सोमवारी खान याला अटक केल्याची माहिती शिळ-डायघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकरयांनी दिली.
चुकीच्या उपचारांमुळे मृत्यू; डॉक्टरला मुंब्रा येथे अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:41 IST