क्रूरता ! मूकबधिर तरुणीची बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या; एकजण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 19:38 IST2020-12-10T19:37:10+5:302020-12-10T19:38:34+5:30
बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला दगडाने ठेचून खून

क्रूरता ! मूकबधिर तरुणीची बलात्कार करून दगडाने ठेचून हत्या; एकजण अटकेत
बिलोली (जि. नांदेड) : शहरातील झोपडपट्टी भागात वास्तव्यास असलेल्या २७ वर्षीय अविवाहित मूकबधिर तरुणीवर बलात्कार करून दगडाने ठेचून खून केल्याकरणी एलसीबीचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या पथकाने एका आरोपीस बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेतले. दरम्यान, कुटुंबीयांसह पोलिसांच्या मदतीने सदर पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
बालपणातच आई-वडिलांचे छत्र हरपलेली मयत मूकबधिर सुनीता नबाजी कुडके (वय २७) आपल्या बहिणीकडे शहरातील झोपडपट्टी(नवीन आबादी) येथे वास्तव्यास होती. मयत तरुणीची बहीण मोलमजुरी करून मूकबधिर तरुणीचा सांभाळ करत होती. ९ डिसेंबर रोजी सदर बहीण नित्यनियमांप्रमाणे मोलमजुरीस गेली होती. सायंकाळी कामाहून परतल्यानंतर मूकबधिर बहीण घरी नसल्याने शोधाशोध सुरू केली; परंतु झोपडपट्टीलगत असलेल्या जि.प.शाळेच्या पाठीमागे शौचास गेल्यानंतर सदर बहिणीवर काही नराधमांनी बलात्कार करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला दगडाने ठेचून खून केल्याचे आढळून आले.
शेजाऱ्यांनी सदर घटनेची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे, सहा. पो. निरीक्षक रामदास केंद्रे, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, सामाजिक कार्यकर्ते राहुल जिगळेकर, रत्नाकर जाधव, गंगाधर कुडके यांना देताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक डोईफोडे यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयास सुपूर्द केला. सदर घटनेबाबत मयताचे चुलत भाऊ दयानंद विठ्ठल कुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३०२,३७६,३५४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तपास पोलीस निरीक्षक शिवाजी अण्णा डोईफोडे करीत आहेत. दरम्यान, सदर घटनेचा विविध स्तरातून निषेध होत असून, या प्रकरणातील नराधमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
सहायक पोलीस अधीक्षकांनी दिली घटनास्थळी भेट
आरोपींना अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईक व समाजबांधवांनी घेतल्यानंतर बुधवारी मध्यरात्री सहा. पोलीस अधीक्षक विजय काबाडे यांनी घटनास्थळी भेट दिली, तर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर व पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी श्वान पथकाच्या साहाय्याने बिलोली येथील एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले. सदर मृतदेहावर वैद्यकीय अधीक्षक डॉ.नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली शवविच्छेदन करून प्रेत नातेवाइकांकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.