लेकीनं दिला लग्नास नकार, संतप्त युवकानं तिच्या वडिलांना संपवलं; दिवसाढवळ्या घडला थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 18:44 IST2025-03-27T18:43:29+5:302025-03-27T18:44:12+5:30
जखमी नरेश यांना हॉस्पिटलला उपचारासाठी नेले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात नीलेश आणि ईश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेकीनं दिला लग्नास नकार, संतप्त युवकानं तिच्या वडिलांना संपवलं; दिवसाढवळ्या घडला थरार
नागपूर - तरूणीने विवाहाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका गुन्हेगाराने तिच्या वडिलांचा चाकू भोसकून दिवसाढवळ्या खून केला. इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी येथे हा प्रकार घडला असून या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
नरेश वालदे असं मृत व्यक्तीचे नाव असून ते ५५ वर्षांचे होते. नीलेश उर्फ नाना मेश्राम व ईश्वर उर्फ जॅकी सोमकुवर अशी आरोपींची नावे आहेत. नीलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याने २०१९ साली एकाची हत्यादेखील केली होती. संबंधित तरूणीला नीलेश अनेक दिवसांपासून त्रास देत होता. बारावीत असताना दोघांची मैत्री होती मात्र नीलेशच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तिने त्याच्याशी संपर्क तोडला होता. कारागृहाबाहेर आल्यानंतर तो तिला भेटायला गेला होता. मात्र तिने त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला होता.
मधल्या काळात नीलेश शांत होता मात्र काही दिवसांअगोदर त्याने तिला गाठले आणि लग्नच कर अशी जिद्द करू लागला. तिने त्याला नकार दिल्यावर त्याने बेदम मारहाणदेखील केली होती. तिने घरी या प्रकाराची माहिती दिली होती. नरेश यांनी आरोपी नीलेशला जाब विचारत मुलीला यापुढे त्रास द्यायचा नाही असं बजावलं होते. यावरूनच नीलेश संतापला होता. वडिलांच्या दबावामुळेच मुलगी लग्नाला नकार देत असल्याचा त्याचा गैरसमज झाला. बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नीलेश ईश्वरसोबत दुचाकीने जाटकरोडी पोलीस चौकीजवळ पोहचला. त्याने नरेश यांना गाठले आणि शिवीगाळ करत त्यांच्या पोटात खंजीर भोसकला.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तिथेच सोडून आरोपींनी पळ काढला. या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमी नरेश यांना हॉस्पिटलला उपचारासाठी नेले असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात नीलेश आणि ईश्वर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहेत.