Daughter in law killed her mother-in-law with the help of a friend | गैरकृत्य करताना पकडणाऱ्या सासूची दगडाने ठेचून हत्या, सुनेसह मित्राला अटक  

गैरकृत्य करताना पकडणाऱ्या सासूची दगडाने ठेचून हत्या, सुनेसह मित्राला अटक  

मुंबई : विवाहितेला सासूने मित्रासोबत गैरकृत्य करताना पकडले. त्यामुळे तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सुनेला प्रियकरासह अटक करण्यात आली. मंगळवारी बोरीवली पोलिसांनी ही कारवाई केली असून अवघ्या २४ तासात या गुन्ह्याची उकल केली.

सलुबाई लाखे (५७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या  गोराईच्या महात्मा फुले झोपडपट्टीत सुनेसोबत राहत हाेत्या. मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो. सून राधा (२८) हिचे त्याच परिसरातील अण्णा माने ऊर्फ दीपक माने (३८) नामक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सलुबाई यांनी राधाला मानेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. 

हे सर्व सासू पतीला सांगेल याची भीती राधाला होती. त्यामुळे तिचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला. २५ ऑक्टोबर रोजी घरासमोरील मोठा दगड राधाने घरात आणून ठेवला. त्यानंतर गरबा खेळण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून निघून गेली. त्यानंतर माने घरी गेला आणि त्याने सलुबाईंची दगडाने ठेचून हत्या केली. बोरीवली पोलिसांनी शवविच्छेदनासाठी  मृतदेह पाठविला. 

 परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाअंती मानेला अटक केली. त्याने राधाच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केल्यानंतर दोघांनाही अटक झाली.

English summary :
Daughter in law killed her mother-in-law with the help of a friend

Web Title: Daughter in law killed her mother-in-law with the help of a friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.