महेंद्रसिंह धोनी, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 20:29 IST2023-03-03T20:28:38+5:302023-03-03T20:29:22+5:30
Credit Card Fraud : फसवणूक करणाऱ्यांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाश्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आणि त्यांच्या माहितीचा वापर केला, असे शाहदराचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रोहित मीना यांनी सांगितले.

महेंद्रसिंह धोनी, अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टीसह अनेक सेलिब्रिटींची ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक!
नवी दिल्ली : सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आता गुन्हेगारांनी चक्क महेंद्रसिंह धोनीसह अनेक बॉलिवूड कलाकारांचे GST ओळख क्रमांक म्हणजेच GSTIN वरून पॅन डिटेल्स मिळवले आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप 'वन कार्ड' द्वारे त्यांच्या नावावर क्रेडिट कार्ड तयार आहेत. दरम्यान, फसवणूक करणाऱ्यांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाश्मी आणि महेंद्रसिंग धोनी यांची नावे आणि त्यांच्या माहितीचा वापर केला, असे शाहदराचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) रोहित मीना यांनी सांगितले.
या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामुळे आम्ही त्यावर अधिक भाष्य करू शकत नाही, असे रोहित मीना यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दरम्यान, या फसवणुकीची माहिती कंपनीला नंतर कळाली, पण त्याआधी फसवणूक करणाऱ्यांनी यापैकी काही कार्ड वापरून 21.32 लाख रुपयांच्या उत्पादनांची खरेदी केली होती. यानंतर कंपनीने तत्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत पाच जणांना अटक केली आहे.
दिल्ली पोलिस सूत्रांनी सांगितले की, पुनीत, मोहम्मद आसिफ, सुनील कुमार, पंकज मिश्रा आणि विश्व भास्कर शर्मा अशी पाच आरोपींची नावे आहेत. त्यांनी मिळून कंपनीची अतिशय असामान्य पद्धतीने फसवणूक केली. एका सूत्राने सांगितले की, "आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी ही फसवणूक कशी झाली ते सांगितले. आरोपींनी गुगलवर सेलिब्रिटींचे जीएसटी डिटेल्स वापरले. त्यांना माहित होते की GSTIN चे पहिले दोन अंक हे राज्य कोड आहेत आणि पुढील 10 अंक पॅन क्रमांक आहेत."
याचबरोबर, या सेलिब्रिटींची जन्मतारीख गुगलवरही उपलब्ध होती. पॅन क्रमांक आणि जन्मतारीख मिळाल्यानंतर त्यांना आवश्यक पॅन डिटेल्स मिळाले. त्यांनी फसवणूक करून पॅन कार्ड पुन्हा तयार केले आणि त्यावर आपला फोटो चिकटवला, जेणेकरून व्हिडिओ पडताळणीदरम्यान त्याचा चेहरा पॅन/आधार कार्डवरील उपलब्ध फोटोशी जुळेल. उदाहरणार्थ, अभिषेक बच्चनच्या पॅनकार्डवर त्याचा पॅन क्रमांक आणि जन्मतारीख होती, परंतु त्यात एका आरोपीचा फोटो होता, असे सूत्राने सांगितले.