पुण्यातील कंपनीवर सायबर हल्ला, सुपर ऍडमीनचा पासवर्ड बदलत कामकाज पाडले बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 22:21 IST2021-05-07T22:21:13+5:302021-05-07T22:21:57+5:30
Cyber attack on a company : हॅकरने पुण्यातील प्रथितयश कंपनीवर सायबर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या संगणकीय प्रणालीत प्रवेश करून कामकाजाचा पासवर्ड बदलला. परिणामी कंपनीचे कामकाज बंद पडले.

पुण्यातील कंपनीवर सायबर हल्ला, सुपर ऍडमीनचा पासवर्ड बदलत कामकाज पाडले बंद
पिंपरी - हॅकरने पुण्यातील प्रथितयश कंपनीवर सायबर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. कंपनीच्या संगणकीय प्रणालीत प्रवेश करून कामकाजाचा पासवर्ड बदलला. परिणामी कंपनीचे कामकाज बंद पडले. बाणेर येथील किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या यमुना बिल्डिंग मधील कार्यालयात ही घटना घडली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीतील माहिती तंत्रज्ञान अधिकारी सुनील अंबादास खानझोडे (रा. विजयानगर कॉलनी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना १८ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजून तीन मिनिटं ते ९ वाजून २१ मिनिटं दरम्यान घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कंपनी व्यवस्थापनाने सहा मे रोजी तक्रार दाखल केली आहे. हॅकरने पब्लिक आयपी अड्रेसचा वापर करीत कंपनीच्या व्हीपीएन युझरचा वापर करून संगणकीय प्रणालीत प्रवेश केला. त्यानंतर कंपनीच्या नेटवर्क स्विचपोर्ट मधील सुपर ऍडमिनच्या खात्यात प्रवेश केला. नेटवर्क स्विच पोर्टमध्ये जाऊन ते बंद केले. त्याच बरोबर कंपनीच्या सुपर ऍडमीनचा पासवर्ड बदलला. त्यामुळे कंपनीच्या इमारतीतील तिसऱ्या मजल्यावरील कामकाज बंद पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.