Cut the neck of the youngster; murdered in the disputes of money | पैशाच्या व्यवहारातून झालेल्या भांडणातून तरुणाची गळा चिरून हत्या 
पैशाच्या व्यवहारातून झालेल्या भांडणातून तरुणाची गळा चिरून हत्या 

ठळक मुद्देसोमवारी आनंद, फरार आरोपी आणि एक मित्र दारू पिण्यासाठी पॅटा गॅलक्सी बिल्डिंगच्या परिसरात बसले होते. प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. दारूच्या नशेत दोघांची व्यवहारावरून शाब्दिक बाचाबाची झाली.

मुंबई - वडाळा येथील अ‍ॅण्टाॅप हिल परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आनंद नारायण असे या मृत व्यक्तीचे नाव असून अ‍ॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. 

धारावी परिसरात राहणाऱ्या आनंदचा टेम्पोचा व्यवसाय आहे. त्याच परिसरातील मारेकऱ्याला त्याने काही दिवसांपूर्वी पैसे उधारीवर दिले होते. दरम्यान सोमवारी आनंद, फरार आरोपी आणि एक मित्र दारू पिण्यासाठी पॅटा गॅलक्सी बिल्डिंगच्या परिसरात बसले होते. दारूच्या नशेत दोघांची व्यवहारावरून शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला पोहचला की, आरोपीने चाकूने आनंदच्या गळ्यावर घातक वार करत पळ काढला. सोबत असलेल्या तिसऱ्या मित्राने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला स्थानिक नागरिकांच्या मदतीने सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान आनंदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतले आहे. तर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


Web Title: Cut the neck of the youngster; murdered in the disputes of money
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.