In the custody of the burglary police, they seized Rs | घरफोडी करणारे पोलिसांच्या ताब्यात, दोन लाख २४ हजार २५० रुपयांचा ऐवज हस्तगत

घरफोडी करणारे पोलिसांच्या ताब्यात, दोन लाख २४ हजार २५० रुपयांचा ऐवज हस्तगत

कर्जत : कर्जत-खालापूर तालुक्यातील कर्जत, नेरळ आणि खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणारे दोन आरोपी पकडण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. त्यांच्या जवळून दोन लाख २४ हजार २५० रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहीवली येथे राहणारे नवनाथ बाबुराव घारे यांच्या घरी २७ आॅगस्ट २०१९ रोजी घरफोडी झाली होती, त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील दोन लाख तीन हजार ७५० रुपयांचे दागिने पळविले होते. तपासात पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती त्याची गाडी, शरीरयष्टी पोलिसांच्या डोक्यात चांगलीच फीट झाली होती.

घरफोडीची घटना होऊन जवळपास सहा महिन्यांचा कालावधी उलटला होता, कर्जत पोलीसठाण्याचे पोलीस नाईक सचिन नरुटे हे नेरळ येथून मोटारसायकलवर कर्जत येत होते, त्या वेळी त्यांना त्यांच्या मोटारसायकलच्या आरशात मोटारसायकलस्वार दिसला, त्याच्या मोटारसायकल चालवण्याची पद्धत व शरीरयष्टीवरून त्यांच्या मनात सीसीटीव्ही फुटेजमधील ती व्यक्ती आठवली, म्हणून त्यांनी त्या मोटारसायकलस्वाराला पुढे जाऊ दिले व वरिष्ठांना याबाबत कळवले. त्या वेळी कर्जत चारफाटा येथे सापळा रचून बसलेले गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे, पोलीस शिपाई भूषण चौधरी यांनी त्याला अडवून त्याची चौकशी केली, त्या वेळी त्याने आपले नाव व पत्ता सांगितला. मात्र, पोलिसांना त्याचा संशय आला म्हणून त्याला ताब्यात घेतले.

पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपविभागीय अधिकारी अनिल घेरडीकर, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन गावडे, सचिन नरुटे आणि भूषण चौधरी यांना तपासात यश आले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव मयूर सोपान भुंडे (रा. चांदणी चौक, ता. मुळशी, जिल्हा पुणे) असे सांगितले. मी व माझ्या साथीदाराने कर्जत, नेरळ, खोपोली परिसरात पाच घरफोड्या केल्याचे कबूल केले, मयूर भुंडे यास पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळताच त्याचा साथीदार हा शिर्डी येथे पळून गेल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. त्या वेळी त्याने आपले नाव सुमित शिवकुमार सूर्यवंशी (रा. आटगाव, ता. शहापूर, जि. ठाणे) असे सांगितले.

मयूर भुंडे याच्यावर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, जिल्ह्यांमध्ये ४३ घरफोड्यांचे गुन्हे असल्याचे समोर आले आहे. आरोपी हा रोहा पोलीस ठाणे वॉरंटमध्ये फरार असल्याचे समजले. कर्जत येथे त्याला पोलिसांनी पकडले असता, गुन्हातील दोन लाख २४ हजार २५० रुपयांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथक तयार केल्यापासून अनेक गुन्ह्यांची प्रकरणे उघड झाली आहेत, गुन्हे तपासकामी त्याचा चांगलाच फायदा झाला आहे.

Web Title: In the custody of the burglary police, they seized Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.