सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या; कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाने घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:42 IST2025-08-02T16:40:26+5:302025-08-02T16:42:14+5:30
हरियाणामध्ये एका जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून हत्या; कावड यात्रेदरम्यान झालेल्या वादाने घेतला जीव
Haryana Crime: हरियाणातील सोनीपतमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका जवानाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मंगळावीर रात्री उशिरा मारेकऱ्यांनी त्याला त्याच्या घरातून बाहेर बोलावून गोळ्या घातल्या. क्षुल्लक कारणावरुन आरोपींनी सीआरपीएफ जवानाला गोळ्या घालून ठार केलं. कावड यात्रेवरुन झालेल्या भांडणानंतर आरोपींनी जवानावर गोळीबार केला आणि पळ काढला. त्यानंतर आता पोलिसांनी याप्रकरणातील आरोपींना अटक केली आहे.
हरिद्वारमधील कावड यात्रेदरम्यान झालेल्या भांडणानंतर २८ जुलै रोजी हरियाणाच्या सोनीपत येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानाची त्याच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होता. जवान कृष्ण कुमार याच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली. ३० वर्षीय कृष्ण कुमार एक महिन्याच्या सुट्टीसाठी घरी आले होते. सोमवारी पहाटे घरी परतणाऱ्या कृष्णावर गोळीबार करून दोन्ही संशयित पळून गेले. कावड यात्रेदरम्यान, काही दिवसांपूर्वी गावातील काही तरुणांनी त्याच्याशी वाद घातला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.
कृष्ण कुमार छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ ड्युटीवर तैनात होते आणि काही दिवसांपूर्वीच रजेवर घरी आले होते. २५ जुलै रोजी त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. या आनंदात ते त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. १७ जुलै रोजी ते घरी आले आणि त्याच्या मित्रांसह हरिद्वारला डाक कावड आणण्यासाठी गेले होते. गावातील आणखी एक गटही कावड आणण्यासाठी गेला होता. २२ जुलै रोजी डाक कावड घेऊन परतत असताना, कृष्णाचा दुसऱ्या गटातील तरुणांशी वाद झाला.
रुग्णालयातून पत्नीला भेटून परतल्यानंतर ते तीन मित्रांसह गावातील जॉली रोडवर फिरायला गेले. तिथे गावातील दोन तरुण कारमधून आले. भांडणामुळे एका तरुणाने पिस्तूल काढून कृष्णाच्या छातीत गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. कृष्णाच्या मित्रांनी कुटुंबाला घटनेची माहिती दिली. कुटुंबाने आणि पोलिसांना घटनास्थळी पोहोचून कृष्णाला रुग्णालयात आणलं. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.