गुन्हेगार

By Admin | Published: August 22, 2014 11:57 AM2014-08-22T11:57:31+5:302014-08-22T11:57:31+5:30

गुन्ह्यांच्या दलदलीत घसरताहेत, वयात येणारी पाऊलं!

Criminals | गुन्हेगार

गुन्हेगार

googlenewsNext
नेहमीचा समज काय, तर मध्यमवर्गीय घरातली, आईवडिलांच्या सुरक्षित छत्रछायेखाली राहणारी, शिकूनसवरून नाकासमोर मध्यममार्गी आयुष्य जगणारी आणि ‘पोलीसकाकां’ना लहान पणापासूनच वचकून असणारी मुलं एकदम सज्जन आणि साधीभोळी असतात.
दुर्दैवानं पोलिसांचं रेकॉर्ड मात्र भयंकरच काहीतरी सांगतंय.
 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातली आकडेवारी मात्र जे चित्र समोर ठेवतेय ते नुस्तं धक्कदायक नव्हे तर काळजी करायला लावणारं आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि छेडछाड यासारखे गंभीर गुन्हे करण्यात अल्पवयीन म्हणजेच १८ वर्षाखालील मुलांचा सहभाग वाढला आहे. नव्हे वाढतोच आहे. गेल्या चार वर्षांतल्या आकडेवारीवर नुस्ती नजर फिरवली तरी हे गंभीर वास्तव हादरवून टाकू शकतं.
महत्त्वाचं म्हणजे २00८ ते २0१२ या पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा गेल्या वर्षी हे गुन्हे दुपटीनं वाढलेले आहेत. दिल्ली आणि मुंबईत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. त्यावरून गंभीर गुन्ह्यात आरोपींची वयोर्मयादा घटवण्याची चर्चाही सुरू झाली. त्यांना ‘बाल गुन्हेगार’ म्हणू नये यासाठी देशभरात रेटा वाढला. माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या. अल्पवयीन असल्याची पळवाट पुढे करून गंभीर गुन्हे करणारे सहज निसटून जातात याविषयी चिंता व्यक्त होऊ लागली.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीवर नजर जरी टाकली तरी हे लक्षात येतं की, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा बनत चाललाय. सोनसाखळी चोर्‍या, पाकीटमारी यासारख्या भुरट्या गुन्ह्यातच नाही तर खून, दरोडे, बलात्कार यासह अनेक गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन म्हणजेच १६ ते १८ वयोगटातली मुलं अडकलेली दिसतात.
कोण असतात ही मुलं?
हे शोधलं तर दिसतं की, नेहमीच्या मध्यमवर्गीय पारंपरिक समजालाही या अहवालातली आकडेवारी छेद देतो. रस्त्यावर राहणारी, बेघर, वस्त्यांमध्ये राहणारी, भूक-गरिबी आणि अन्यायानं पिडलेली मुलं गुन्हेगारीकडे लवकर वळतात, हातात कायदा घेतात हा समजच हा अहवाल मोडीत काढतोय.
गेल्यावर्षी देशभरातून विविध गुन्ह्यांमध्ये ४३,५0६ अल्पवयीन मुलं गजाआड झाली. त्यापैकी तब्बल ८१ % (३५,२४४) मुलं ही आपापल्या चौकोनी घरात, पालकांबरोबर सुरक्षित आयुष्यच जगत होती. बहुतांशी मध्यमवर्गीयच घरातली होती. त्यांचे पालक त्यांना अनेक सोयीसुविधा देता याव्यात म्हणून राबत होती. मात्र सुरक्षित चाकोरीतलं आयुष्य सोडून आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी हपापलेल्या या मुलांनी गुन्हे करण्याचीही हिंमत केली. त्यात त्यांचा अट्टहास एकच, मला जे हवं ते मला मिळायला हवं. माझे पालक, परिस्थिती जर ते मला देऊ शकत नसेल तर ते मी हिसकावून, ओरबाडून तरी घेईल किंवा चोरी तरी करीन! म्हणून तर हत्त्या, सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, बलात्कार, अपहरण, जबरी चोरी, लुटमार, वाहनचोरी, मारहाण, विनयभंग, छेडछाड यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये ही जेमतेम वयात आलेली मुलं अडकलेली दिसतात. दुर्दैव म्हणजे हे सारं घडत असताना आपला मुलगा काय करतोय याची त्यांच्या पालकांना काहीएक खबर नव्हती.
देशात हे चित्र असं भयावह असताना पुढारलेला आणि पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र या अल्पवयीन गुन्हेगारीच्या संदर्भातही दुर्दैवानं आघाडीवरच आहे. आणि महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई त्यात अव्वलस्थानी पोहचलेली आहे.
  जानेवारी २0१0 ते जून २0१४ या कालावधीमध्ये महाराष्ट्रात १६ हजार ७२७ स्वरूपाचे गंभीर गुन्हे अल्पवयीन तरुणांच्या हातून घडले. त्यामध्ये तब्बल ५८९ गुन्हे हे खुनाचे आहेत. आणि ज्यांचा खून या मुलांनी केला ते सारे बहुतांशी त्याचे जवळचे नातेवाईक किंवा रोजच्या संपर्कातलेच लोक आहेत. क्षणिक लोभ, क्षणिक संताप यामुळे कसलाही मागचा पुढचा विचार न करता अत्यंत क्रूरपणे या मुलांनी आपल्याच माणसांचे जीव घेतले.
दुसर्‍याच्या जिवावर उठणारे एकीकडे, दुसरीकडे शरीरसुखासाठी, काही पिसाटलेलेही. मुलांच्या लैंगिक गरजांचं वय खाली उतरतंय, त्यांना वेळेत लैंगिक शिक्षण देण्याची गरज आहे यावर चर्चा बर्‍याच होतात. पण प्रत्यक्षात घडत काही नाही. आणि त्याचवेळी समाजात मात्र ज्यांनी वयाची १८ वर्षंही पूर्ण केलेली नाहीत असे अनेक जण बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. 
एकट्या महाराष्ट्रात ६२८ अल्पवयीन मुलं बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी आहेत. खुनी हल्ला व विनयभंगाच्या घटनांमध्ये अनुक्रमे ६१४ व ७४0 जण आरोपी आहेत. अर्थात ही पोलिसांच्या दप्तरी  दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती असून, प्रत्यक्षात त्याचा आकडा त्याहून मोठा असण्याचीही शक्यता आहे. 
कायद्यासमोर ही मुलं अल्पवयीन आहेत, इतके दिवस तर १८ वर्षं वयाखालील असलेल्या मुलांना गंभीर गुन्ह्यातही सुधारगृहातच पाठवलं जाई. मोठय़ा शिक्षेतून त्यांची सुटका व्हायची. आता मात्र १६ ते १८ या वयोगटातील मुलं जर गंभीर गुन्ह्यात अडकलेली असली तर त्यांनाही प्रौढ गुन्हेगारांप्रमाणेच शिक्षा होऊ शकते, तशी दुरुस्तीही नुकतीच कायद्यात करण्यात आली आहे.
शिक्षा किती व्हावी, कठोर व्हावी की नाही, सुधारगृह सुधारणेची, पुनर्वसनाची, आयुष्य नव्यानं सुरू करण्याची संधी देतात की नाही हा पुढच्या चर्चेचा विषय.
पण अशा गुन्हेगारी वळणावर जाण्यापासून तरुण आणि वयात येणार्‍या मुलांना रोखण्यासाठी प्रयत्न आपल्याच घरापासून करण्याची गरज आहे. आपला काय संबंध म्हणत जबाबदारी झटकता येणार नाही. त्यासाठी कुटुंबातल्या वडीलधार्‍यांनी जागं राहत मुलांशी संवाद तर ठेवला पाहिजेच, पण मुलांनीही आपल्या हावरट गरजांचं करायचं काय, याचाही विचार करायला हवा.!
नाहीतर उमलतं आयुष्य मातीमोल व्हायला असा कितीसा वेळ लागतो?
 
हवंय म्हणजे हवंय!
जे आपल्याला हवंय ते घरचे देत नसतील तर सरळ चोरी करून मिळवण्याच्या हावरटपणाला 
आवर घालायचा कुणी?
 
मित्राकडे असलेल्या करिज्मा गाडीचा राहुल आणि अमोलला हेवा वाटायचा.. आपल्याकडेही अशी गाडी असावी, आपणही करिज्मावर शायनिंग मारत त्याच्यासारखंच  कॉलेज कॅम्पसमध्ये फिरावं, असं त्या दोघांना नेहमी वाटायचं. पण घरची परिस्थिती अगदीच जेमतेम. शेवटी आपली हौस भागविण्यासाठी राहुल आणि अमोलनं एक दिवस त्या मित्राची करिज्मा चोरली.
मात्र, ही चोरी काही त्यांना दडवता आली नाही. ते दोघं पकडले गेले.  गुन्हा दाखल झाला, हातात बेड्या पडल्या. तेव्हा त्यांनी ढसढसा रडत कबूल केलं की केवळ हावरटपणा, जे त्याच्याकडे आहे ते आमच्याकडे का नाही या हव्यासापोटी ती गाडी आम्ही चोरली. पण चोरीचा ठप्पा त्यांच्या माथी लागला तो लागलाच. केवळ चंगळ करता यावी म्हणून केलेल्या अट्टहासापायी औरंगाबादमधल्या या मध्यमवर्गीय घरातल्या दोन सुशिक्षित तरुणांचे अख्खे करिअर बरबाद झाले.
असाच एक किस्सा. औरंगाबाद महानगरपालिकेतल्या उच्चपदस्थ अधिकार्‍याच्या मुलालाही काही महिन्यांपूर्वी येथील मुकुंदवाडी पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात रंगेहाथ अटक केली होती. त्याच्याकडून चोरीच्या अनेक टू व्हिलर्स जप्त करण्यात आल्या होत्या. त्या मुलाला बरीच व्यसनं जडलेली होती. घरच्यांकडून मिळणार्‍या पॉकेटमनीत हे शौक पूर्ण होत नसत. त्यामुळे आपले शौक पूर्ण करण्यासाठी त्यानं असा दुचाकी चोरीचा मार्ग पत्करल्याचं नंतर उघडकीस आलं. 
उस्मानपुरा परिसरात पाण्याच्या टँकरचा व्यवसाय असलेल्या व्यापार्‍याचा मुलगाही घरफोड्यांच्या गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागला होता. 
एका पोलीस विभागातल्या कर्मचार्‍याचाच मुलगा मंगळसूत्र चोरी करताना रंगेहाथ पकडला गेला. त्यानं अनेक मंगळसूत्र चोर्‍या केल्याचं तपासात उघडकीस आलं.
अलीकडेच चेन स्नॅचिंग प्रकरणात एक विद्यार्थी पोलिसांच्या हाती लागला. बुलढाण्याचा मुलगा. मंगळसूत्र ओढताना सापडला. चौकशी केल्यावर त्या मुलानं सांगितलं की, घरचे देतात तो पॉकेटमनी पुरत नाही म्हणून मग असा सोनसाखळ्या ओढायला लागलो.
अनेक ठिकाणाहून विद्यार्थी जिथं शिक्षणासाठी येतात अशा मोठय़ा होत जाणार्‍या औरंगाबादसारख्या अनेक शहरांत हे अशा चोर्‍यांचे प्रकार सर्रास घडताना आढळतात, अशी माहिती पोलीस देतात. मध्यमवर्गीय कुटुंबातीलच हे तरुण. त्यांना दोन वेळचं खायला मिळत नाही, पर्यायच नाही म्हणून ते चोरी करतात असं काही नाही तर त्यांच्या वाढलेल्या गरजा भागतील इतपत पैसे घरचे देत नाही म्हणून ते अशा भुरट्या चोर्‍या करण्याचाही मार्ग पत्करू लागले आहेत. तरुण गुन्हेगारी विश्‍वाकडे कसे वळत आहेत. 
पूर्वी चोर्‍या, वाटमारीसारख्या गुन्ह्यांमध्ये केवळ निरक्षर, गरीब कुटुंबातल्या तरुणांचा समावेश आढळून यायचा. मात्र, गेल्या पाच- सात वर्षांमध्ये हे चित्र बदलतंय. आता अशा गुन्ह्यांमध्ये पकडल्या जाणार्‍या दर दहा-पंधरा गुन्हेगारांपैकी एक आरोपी हा उच्चशिक्षित, सधन घराचा असतो, असं सातत्यानं दिसून येत आहे.
अनेक छोट्या-मोठय़ा शहरांतल्या पोलीस रेकॉर्डमध्ये सध्या अशा कहाण्या दिसतात. अनेक उमलती आयुष्यं गुन्हेगारीच्या दलदलीत लोटली जाताना दिसतात. आणि या सार्‍याला जबाबदार कोण? फक्त ती मुलं? त्यांचे पालक? की आपला समाज?
उत्तरं शोधावी लागतील कारण प्रश्न एका पिढीच्या बदलत्या मानसिकतेचा आहे.
 
 
हावरटपणाचे बळी?
दिवसभर घरात सुरू असणारा टीव्ही, त्यावरचे कार्यक्रम, व्हिडीओ गेम्स, इंटरनेटचा अतिमारा आणि घरी एकटंच राहणं या सार्‍याचा परिणाम वयात येणार्‍या मुलांवर होतो आहेच. त्यात आता सोशल मीडियाची भर पडली आहे. आपल्याला हवी असलेली एखादी गोष्ट झटपट मिळवण्यासाठी अनेक मुलं कसलाही विचार न करता टोकाची भूमिका घेताना दिसतात. त्यातूनच बाल गुन्हेगारांच्या संख्येत वाढ होते आहे. वयाची १८ वर्षंही पूर्ण नसलेली ही मुलं अनेक गंभीर गुन्ह्यांत पकडली जातात. तेव्हा त्यांना इतर गुन्हेगारांप्रमाणं वागवता येत नाही, पोलिसांवर कायद्याचं बंधन आहे. आणि मुख्य म्हणजे गुन्हा घडल्यावर पोलीस जे करू शकतात त्याला र्मयादा आहेतच. मात्र घरोघर पालकांनी, सामाजिक संस्थांनी मुलांशी संवादाचं, ते काय आणि कशासाठी करत आहेत, यावर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. पालकांचं मुलांकडे दुर्लक्ष, समाजात संवादाचे तुटक होत चाललेले दुवे आणि मुलांचं एकाकीपण, त्यांची हाव ह्यामुळे गोष्टी बिघडत जात आहेत. 
मुलांनीही आपण कशासाठी काय करतोय, त्यातून आपण कुठली आत्यंतिक गंभीर, बेकायदा कृती करतोय याकडे लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी प्रश्न या मुलांच्या आयुष्याचा आहे. 
- संजीव दयाळ 
(पोलीस महासंचालक)
 
गेल्या साडेचार वर्षातील  बालगुन्हेगाराची आकडेवारी गुन्हे/ वर्ष२0१0२0११२0१२२0१३जून २0१४ एकुण
खून९८१४५११७१७५५४५८९
खूनाचा प्रयत्न१00१३५१२८१७५७६६१४
बलात्कार८८१२५८९२१0११६६२८
विनयभंग९३१0८९६ २८९१५४७४0
अपहरण४२५0 ३७९९७२३00
दरोडा४६४८६५१0६४५३१0
दरोड्याचा प्रयत्न१८१४२९२९१८१0८
जबरी चोरी१६६१७६२४३३८४१२९१0९८
एकुण३१६८३५४७३४६0४८३९१६६३१६७२७
 
संकलन आणि लेखन :
जमीर काझी (मुंबई), विनोद काकडे (औरंगाबाद), जयेश शिरसाठ (मुंबई)

 

Web Title: Criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.