बँकेत जात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलासह बांधून नदीत फेकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 20:42 IST2020-10-11T20:37:05+5:302020-10-11T20:42:31+5:30
Crime News : आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर काही नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

बँकेत जात असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, मुलासह बांधून नदीत फेकले
बक्सर (बिहार) - गेल्या काही दिवसांपासून देशभरातून महिलांवरील सामूहिक बलात्काराच्या हादरवून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. दरम्यान, बिहारमधील बक्सर येथे आपल्या पाच वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन बँकेत जात असलेल्या महिलेवर काही नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, बलात्कारानंतर या महिलेला मुलासह बांधून नदीत फेकून दिले. ज्यामध्ये या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
बिहारमधील बक्सरमध्ये घडलेल्या या घटनेने सर्वसामान्यांना हादरवले आहे. मुरार ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ओझा, बराव गावात बँकेत जात असलेल्या एखा महिलेचे तिच्या मुलासह अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर नराधमांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. नंतर या महिलेस मुलासह बांधून नदीत फेकण्यात आले.
या घटनेबाबत पीडियेच्या वडलांनी सांगितले की, त्यांची मुलगी आपल्या पाच वर्षांच्या मुलासह बँकेत जात होती. मात्र ११ वाजल्यानंतर तिचा मोबाईल बंद येऊ लागला. नंतर आपली मुलगी आणि तिचा मुलगा नदीमध्ये बांधलेल्या अवस्थेत सापडले. तिला वाचवले गेले. मात्र मुलाचा मृत्यू झाला होता.
महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्यानंतर काही लोक महिलेला वाचवण्यासाठी धावून गेले. नंतर या महिलेला नदीतून बाहेर काढण्यात आले. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे.