संतापजनक! मुलीला जन्म दिला म्हणून महिलेला सासरच्यांनी केली लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 14:21 IST2022-06-04T14:18:57+5:302022-06-04T14:21:34+5:30
Crime News : दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून पती आणि सासरच्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

फोटो - NDTV
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. मुलीला जन्म दिला म्हणून एका महिलेला तिच्या सासरच्यांनी लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात एका महिलेने मुलाला जन्म न दिल्याने तिला क्रूर शिक्षा देण्यात आली आहे. दोन मुलींना जन्म दिल्याच्या कारणावरून पती आणि सासरच्यांनी महिलेला बेदम मारहाण केली. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हि़डीओमध्ये सासरच्या दोन महिला पीडित महिलेला घरासमोर रस्त्याच्या मधोमध लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. याच दरम्यान दोन्ही महिला तिला शिवीगाळ करत असून तिला रडू नको असा दम देखील देत असलेला पाहायला मिळत आहेत. लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यासोबतच तिचे केस पकडून तिला ओढत नेलं. दोन मुली झाल्यामुळे पती आणि सासरच्या मंडळींनी तिला वारंवार मारहाण आणि छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
"सासरच्या लोकांना मुलगा हवा होता. पण मुलगा न झाल्यामुळे माझा पती आणि सासरचे लोक मला त्रास देत होते. मी दुसऱ्या मुलीला जन्म दिल्यावर छळ वाढला. मला अनेकदा उपाशी देखील ठेवलं. त्यानंतर मी मजुरीचे काम करू लागली" अशी माहिती महिलेने दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. महोबाच्या पोलीस अधीक्षक सुधा सिंह यांनी "पीडित महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.