जबरी चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक
By पंकज पाटील | Updated: September 21, 2022 18:29 IST2022-09-21T18:28:44+5:302022-09-21T18:29:46+5:30
वांगणी जवळील डोणे गावात मोरेवाडी परिसरात राहणाऱ्या विजया मोरे यांच्या घरात तिघा चोरट्यांनी जबरी चोरी करण्याचा कट रचला होता.

जबरी चोरी करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक
बदलापूर - वांगणी जवळील डोणे गावच्या परिसरात एका घरात जबरी चोरी करून आणि एका व्यक्तीला गंभीर जखमी करून पळून गेलेला तिघा आरोपींचा पोलिसांनी शोध घेतला आहे. आरोपींकडून मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.
वांगणी जवळील डोणे गावात मोरेवाडी परिसरात राहणाऱ्या विजया मोरे यांच्या घरात तिघा चोरट्यांनी जबरी चोरी करण्याचा कट रचला होता. त्यानुसार आरोपींनी 16 सप्टेंबर रोजी घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत विजया मोरे यांच्याकडील मोबाईल, गळ्यातले मंगळसूत्र आणि पंचवीस हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी विजया मोरे यांचा मुलगा अनमोल याने चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी चोरट्यांपैकी एकाने अनमोल याच्या छातीवर आणि गळ्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात अनमोल गंभीर रित्या जखमी झाला होता.
घडल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता. या गंभीर गुन्हा प्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीसांनी तिघाही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. या जबरी चोरी व्यतिरिक्त इतर कोणत्या गुन्हा त्यांचा सहभाग होता काय याची देखील पोलीस माहिती घेत आहेत. या गंभीर प्रकरणात प्रवीण पांडे, विनोद होटकर आणि विकास नेमाणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.