‘तडीपार’ पोलिसांच्या रडारवर! दहा दिवसात तिसरा गुंड जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 14:50 IST2021-12-12T14:35:24+5:302021-12-12T14:50:55+5:30
Crime News : गेल्या दहा दिवसात तीन गुंडांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले असताना स्थानिक पोलिसांना मात्र तडीपार केलेल्या परंतू हद्दीत वावरणाऱ्या गुंडांचा थांगपत्ता लागत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

‘तडीपार’ पोलिसांच्या रडारवर! दहा दिवसात तिसरा गुंड जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई
डोंबिवली - गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले आणि नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुंडांना तडीपारीचे आदेश बजावले जातात. परंतू हे गुंड राजरोसपणो मनाई केलेल्या हद्दीत वावरत असल्याचे नुकत्याच गुन्हे शाखा युनिट-3 च्या पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. गेल्या दहा दिवसात तीन गुंडांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेला यश आले असताना स्थानिक पोलिसांना मात्र तडीपार केलेल्या परंतू हद्दीत वावरणाऱ्या गुंडांचा थांगपत्ता लागत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
सनी परशुराम जाधव, कैलास सुभाष जोशी उर्फ जेपी या दोघा तडीपार गुंडांना याआधी अटक केली असताना शुक्रवारी संकेत नितीन गायकवाड या गुंडाला जेरबंद करण्यात आले. ठाणे पोलिस मुख्यालयातील हवालदार दत्ताराम भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक भूषण दायमा, पोलिस उपनिरिक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय माळी, पोलिस हवालदार विश्वास माने, गुरूनाथ जरग, वसंत बेलदार, सचिन वानखेडे, महेश साबळे आदिंच्या पथकाने गायकवाडला मानपाडा, पी एन टी कॉलनी परिसरातील एका खानावळीच्या ठिकाणी अटक केली. तो रामनगर पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
हत्यार बाळगणे, घरात घुसून मारणे, रॉबरी करणे अशा गंभीर स्वरूपाचे 3 गुन्हे दाखल आहेत. 24 ऑगस्टपासून दोन वर्षाकरीता ठाणे जिल्हयातून तडीपार करण्यात आले आहे. याउपरही तो मनाई केलेल्या हद्दीत बिनदिककतपणे वावरत होता. दरम्यान गेल्या दहा दिवसात अटक केलेला गायकवाड हा तिसरा तडीपार गुंड आहे. त्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे आतापर्यंत अटक करण्यात आलेले तिन्ही तडीपार गुंड मनाई केलेल्या हद्दीत वावरत असल्याची खबर पोलीस हवालदार भोसले यांनी गुन्हे शाखेला दिली आहे.