भयंकर! धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेने केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 14:51 IST2022-05-18T14:50:47+5:302022-05-18T14:51:56+5:30
Crime News : एका महिलेने धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप करत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना समोर आली आहे.

भयंकर! धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप करत महिलेने केला स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप करत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. या महिलेने रामनाथपुरम जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थित असलेल्या पोलीस आणि अधिकाऱ्यांनी महिलेला वेळीच रोखल्याने अनर्थ टळला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वलारमती असं या महिलेचं नाव आहे.
वलारमतीने दिलेल्या माहितीनुसार, गावातील देवदास नावाच्या व्यक्तीच्या कुटुंबाकडून तिला आणि तिच्या कुटुंबाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं जातं आहे. धर्मांतर करण्यास नकार दिल्याने देवदास आणि त्याचे कुटुंबीय 2019 पासून तिचा आणि तिच्या कुटुंबाचा छळ करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे आपण आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला असं देखील तिने म्हटलं आहे.
"देवदासच्या कुटुंबीयांनी माझ्या घरचा रस्ता बंद केला आणि माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले. आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात आमच्या बाजूने निकाल लागल्याने त्याने गाडीने चिरडून मला मारण्याचा प्रयत्न केला म्हणून मी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी कारवाई करण्याचं वचन दिलं परंतु कारवाई केली नाही. त्यांनी माझ्या मुलाला मारण्याचा प्रयत्न केला. परंतु लोकांनी त्याला वाचवलं, देवदासमुळे आमचं खूप नुकसान झालं आहे" अशी माहिती महिलेनं दिली.
दरम्यान, रामनाथपुरम पोलीस अधीक्षक कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महसूल विभाग अधिकारी आणि पोलीस उप अधीक्षक यांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. ज्यामध्ये हा मुद्दा जमिनीच्या वादावर आधारित असल्याचं समोर आलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून या दोन कुटुंबांमध्ये जमिनीचा वाद सुरू असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.