अंधश्रद्धेचा कहर! चेटकीण असल्याचं सांगून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 18:00 IST2021-12-05T17:59:02+5:302021-12-05T18:00:16+5:30
Crime News : एका वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

अंधश्रद्धेचा कहर! चेटकीण असल्याचं सांगून वृद्ध महिलेला बेदम मारहाण, घटनेने खळबळ
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालमध्ये अंधश्रद्धेचा कहर पाहायला मिळत आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका वृद्ध महिलेला चेटकीण ठरवून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील सतगेरिया भागात ही घटना घडली आहे. मारहाणीत वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी महिलेला मेदिनीपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्थानिक आमदाराने रुग्णालयात जाऊन वृद्ध महिलेची भेट घेतली.
पोलिसांनी या प्रकरणावर तातडीने कारवाई करत चार महिलांसह एकूण 10 जणांना अटक केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील सदर ब्लॉकमधील सातगेरिया भागात 10-12 लोक आले आणि त्यांनी वृद्ध महिलेशी गैरवर्तन केले आणि तिला बेदम मारहाण केली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. स्थानिक नागरिकांनी महिलेला गंभीर अवस्थेत पाचखुडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. स्थानिक रुग्णालयात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मेदिनीपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तेथे या महिलेवर उपचार सुरू आहेत.
मारहाण प्रकरणी 10 जणांना अटक
पोलिसांनी कारवाई करीत 10 जणांना अटक केली. परिसरातील आमदार दिनेन रॉय वृद्ध महिलेला पाहण्यासाठी रुग्णालयात गेले होते. आमदार स्थानिक टीएमसी नेते आणि आदिवासी नेत्यांसह रुग्णालयात पोहोचले. ही सामाजिक समस्या असल्याचे आमदार दिनेन रॉय यांनी सांगितले. कोतवाली पोलिसांनी काही आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. भारत जकात मांझी समूहाच्या सदस्यांनी ही समस्या सामाजिकरित्या सोडवण्यासाठी पुढे आले आहे. यापूर्वीही महिलेला मारहाण करण्यात आली होती. आमदार दिनेन रॉय यांनी सांगितले की, त्या बऱ्याच दिवसांपासून बेघर होत्या. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत हे पाहण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.
चेटकीण बोलून अत्याचार करणे हा कायदेशीर गुन्हा
चेटकीण बोलून अत्याचार करणे हा कायदेशीर गुन्हा आहे, अशा सक्त सूचना ग्रामस्थांना दिल्याचं देखील आमदारांनी सांगितलं आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून गावातील लोक महिलेला चेटकीण म्हणत त्रास देत होते. तिला मारहाणही करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाकडून ग्रामीण भागातील जनतेमध्ये या कुरितीविरुद्ध जनजागृती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं देखील त्यांनी म्हटलं आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.