मीरा रोड : निवृत्त लष्करी महिला अधिकाऱ्याच्या दिव्यांग मुलास काळ्या जादूने बरे करण्याचे व लग्नाचे आमिष दाखवून १ कोटी ९२ लाखांना ११ जणांनी फसविल्याप्रकरणी मुख्य आरोपीस मीरा रोड पोलिसांनी अटक केली आहे. मूळच्या केरळच्या सुशिला ठाकूर (६७) या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या लष्करी महिला अधिकाऱ्याशी २०१९ मध्ये फेसबुकवर केरळच्या बद्रुद्दीन मुनीर याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला सुशीला यांचा दिव्यांग मुलगा काळी जादू करून बरे करतो सांगून, तसेच काळी जादू करणारा पुजारी भाजला म्हणून बद्रुद्दीन याने पैसे उकळले. त्यानंतर गोपाळ कृष्णा हे ज्येष्ठ वकील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार असून, त्यांच्याशी लग्न करा, असा सल्ला देत त्या वकीलासोबत ओळख करून दिली. नंतर बंगळुरू येथे हॉटेल खरेदी, तर केरळ येथे बंगला खरेदी करायचा सांगून त्यांनी सुशीला यांच्याकडून पैसे उकळले. बँकेतील रक्कम व दोन सदनिका विकून सुशीला यांनी तब्बल १ कोटी ९२ लाख ३५ हजार रुपये बद्रुद्दीन व साथीदारांना दिले होते. परंतु, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये बद्रुद्दीनसह ११ जणांवर मीरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपी बद्रुद्दीन याला पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्याला केरळच्या न्यायालयात हजर केल्यावर मंगळवारी मीरा रोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
Crime News : निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला गंडा घालणाऱ्यास बेड्या, काळी जादू आणि लग्नाच्या आमिषाने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 10:14 IST