भयंकर! मध्यरात्री व्यायाम करताना आई ओरडली; संतापलेल्या मुलाने डंबेल्सने तिची हत्या केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 14:34 IST2022-01-25T14:26:44+5:302022-01-25T14:34:59+5:30
Crime News : आईला वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीवरही तरुणाने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केलं.

भयंकर! मध्यरात्री व्यायाम करताना आई ओरडली; संतापलेल्या मुलाने डंबेल्सने तिची हत्या केली
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका मुलाने रागाच्या भरात आपल्या जन्मदात्या आईचीच हत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री व्यायाम करताना आईने हटकल्याने संतापलेल्या मुलाने तिची हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. याचवेळी आईला वाचवण्यासाठी आलेल्या बहिणीवरही तरुणाने जीवघेणा हल्ला केला आणि जखमी केलं. तेलंगणातील हैदराबादच्या सुलतान बाजार परिसरात सोमवारी ही घटना घडली. कोंडा सुधीर कुमार असं या आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कोंडा सुधीर कुमार हा मानसिक आजारी आहे. तो रात्रीच्या दोन वाजता डंबेल्सने व्यायाम करत होता. त्याच्या आईने त्याला व्यायाम करताना पाहताच ती त्याला ओरडली. आई कोंडा पापम्मा हिने त्याला हटकलं. यामुळे संतापलेल्या सुधीरने डंबेल्सने मारहाण करत तिची हत्या केली. तो आईला मारत असताना त्याची बहीण आईला वाचवण्यासाठी आली. मात्र, सुधीरने तिच्यावरही जीवघेणा हल्ला केला. या घटनेत आईचा मृत्यू झाला असून त्याची बहीण सुचित्रा बचावली आहे. आरोपी सुधीरला अटक करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
सुधीर हा पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर फूड डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत होता. मात्र वर्षभरापूर्वी त्याने नोकरी सोडली आणि तो घरीच राहत होता. तपासादरम्यान पोलिसांना कळले की सुधीर हा मानसिक आजारी होता आणि त्याच्यावर अलीकडेच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वडिलांचे निधन झाल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून तो आई आणि बहिणीसोबत राहत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. इंडिया टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.