भयंकर! मोबाईल दिला नाही म्हणून नववधूने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 15:29 IST2022-05-02T15:28:33+5:302022-05-02T15:29:53+5:30
Crime News : नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे.

भयंकर! मोबाईल दिला नाही म्हणून नववधूने टोकाचं पाऊल उचललं; आत्महत्या करून जीवन संपवलं
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलसाठी एका नववधूने टोकाचं पाऊल उचललं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यामध्ये नवीन मोबाईलची मागणी पूर्ण झाली नाही म्हणून एका नवविवाहितेने विष घेऊन आत्महत्या केली आहे. रविवारी रात्री तिने टोकाचा निर्णय घेतला. तिने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मेडिकल कॉलेज झाशी येथे जाण्यास सांगितलं.
उपचारासाठी घेऊन जात असतानाच रस्त्यातच महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोतवाली परिसरातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली. चंद्रशेखर यांनी आपली मुलगी अंगुर हिचं लग्न नरेंद्र सोबत ठरवलं होतं. तिने आपला दीर सुमितच्या माध्यमातून सासऱ्यांकडे मोबाईलची मागणी केली होती.
सासऱ्याने देखील मोबाईल फोन देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मोबाईल न मिळाल्याने तिने टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सासरच्या मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची मानसिक अवस्था ठीक नव्हती. तिच्या सर्व इच्छा नेहमीच पूर्ण केल्या जात होत्या. पण त्यानंतर पुन्हा आता ती मोबाईल हवा असा हट्ट करत होती. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.