पती झाला हैवान! दगडाच्या पाट्याने डोके ठेचून पत्नीची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का
By गौरी टेंबकर | Updated: July 16, 2022 13:05 IST2022-07-16T13:01:08+5:302022-07-16T13:05:26+5:30
Crime News : पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला.

पती झाला हैवान! दगडाच्या पाट्याने डोके ठेचून पत्नीची हत्या; कारण ऐकून बसेल धक्का
मुंबई - पत्नीने जवळ झोपू दिले नाही या रागाच्या भरात पतीने दगडाच्या पाट्याने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसानी मारेकरी ज्ञानदेव गणपत बलाडे (५८) याला अटक केली आहे. मालवणीच्या यशोदीप को हाऊसिंग सोसायटी (अंदा कॉलनी ) येथील खोली क्रमांक ६६ , गेट क्रमांक ८ मध्ये बलाडे कुटुंबीय राहतात.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलै, २०२२ रोजी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. बलाडेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याची पत्नी विजयमाला (४८) ही त्याला स्वतः जवळ झोपू देत नव्हती. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. या भांडणाच्या रागात त्याने घरी असलेला दगडाचा पाटा थेट तिच्या डोक्यात घातला. त्यात ती गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर ज्ञानदेव याने उशिरारात्री स्वतःच हा प्रकार पोलीस ठाण्यात जाऊन सांगितला आणि आत्मसमर्पण केले.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याच्या पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. त्याच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेंद्र सुर्यवंशी यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. एका व्यक्तीने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची बातमी मालवणीत पसरली आणि त्यामुळे मालाडमध्ये खळबळ उडाली आहे.