खळबळजनक! 'त्याने' आधी तिला मारलं नंतर स्वत:लाच संपवलं; पोलीसही हैराण, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 16:14 IST2022-01-23T16:06:12+5:302022-01-23T16:14:01+5:30
Crime News : एका पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वत:लाच संपवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.

खळबळजनक! 'त्याने' आधी तिला मारलं नंतर स्वत:लाच संपवलं; पोलीसही हैराण, नेमकं काय घडलं?
नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीने आपल्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वत:लाच संपवल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. दिल्लीच्या ख्याला परिसरातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर सर्जिकल ब्लेडने हल्ला करून तिला जखमी केलं आणि त्यानंतर घटनास्थळावरून तो फरार झाला. मात्र जेव्हा पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा आरोपी एका नातेवाईकाच्या घरामध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आरोपीने आत्महत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 जानेवारी रोजी दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये एक फोन आला. त्यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने याबाबत माहिती दिली. आरोपीने आपल्या पत्नीवर सर्जिकल ब्लेडने जीवघेण्या हल्ला करून तिला गंभीररित्या जखमी केल्याचं सांगितलं. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पण त्यावेळी आरोपी फरार झाला होता. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मानसी गंभीररित्या जखमी
रामकुमार बजाज असं आरोपीचं नाव असून त्याने पत्नी मानसी बजाजवर रागाच्या भरात हल्ला केला. सर्जिकल ब्लेडने खूप वार केले आणि तो पळून केला. यामध्ये मानसी गंभीररित्या जखमी झाली आहे. मानसी आणि तिच्या पतीमध्ये अनेकदा विविध कारणांमुळे वाद होत असायचे. त्यामुळे कंटाळून मानसी माहेरी निघून आली होती. रामकुमार मानसीला पुन्हा सासरी घेऊन जाण्यासाठी आला होता. पण मानसीने त्याच्यासोबत येण्यास नकार दिल्याने पुन्हा त्यांच्यामध्ये मोठं भांडण झालं.
परिसरात एकच खळबळ
मानसीची आई घरी नसताना रामकुमारने तिच्यावर जीवघेणा हल्ला केला. सर्जिकल ब्लेडने खूप वार केल्यामुळे त्याला मानसीचा मृत्यू झाला असं वाटलं आणि तो घाबरून फरार झाला. या घटनेनंतर पोलीस रामकुमारचा शोध घेत होते. पण त्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. याच दरम्यान पोलिसांनी रामकुमारच्या एका नातेवाईकाच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर तिथे आरोपी त्यांना पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.