Crime News: मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद; डोक्यात खलबत्ता घालून पोलीस हवालदाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2022 06:58 IST2022-01-08T06:58:09+5:302022-01-08T06:58:21+5:30
पत्नी, मुलीला अटक : मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद. कोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Crime News: मुलगी सासरी नांदत नसल्यावरून वाद; डोक्यात खलबत्ता घालून पोलीस हवालदाराची हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मुलगी सासरी नांदत नाही या कारणावरून झालेल्या वादात मुलगी आणि पत्नीकडून पोलीस हवालदाराची डोक्यात खलबत्ता घालून हत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास पूर्वेकडील नाना पावशे चौक भागात घडली. प्रकाश राजाराम बोरसे असे मृत पोलीस हवालदाराचे नाव असून ते मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत होते. हत्येप्रकरणी त्यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
बोरसे हे गुरुवारी कामावरून संध्याकाळी सात वाजता कोळसेवाडीतील नाना पावशे चौक परिसरातील घरी आले. त्यांची मुलगी भाग्यश्री हिचे लग्न झाले असून तिचे सासरकडील आडनाव पवार असे आहे. परंतु, तिचे नवऱ्याबरोबर पटत नसल्याने ती आई-वडिलांकडेच राहत होती. मुलगी सासरी नांदत नाही यावरून घरात रात्री आठच्या सुमारास भांडण झाले. या भांडणात पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री हिने घरातील खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. यात प्रकाश हे जागीच कोसळले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी घटनास्थळी पथक रवाना केले. दोघींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मृतदेहाशेजारी त्या चार तास बसून होत्या
कोळसेवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. तो तोडून ते घरात शिरले. घरात प्रकाश यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. तर मृतदेहाशेजारी माय-लेकी बसून होत्या. हत्या करून चार तास त्या मृतदेहाशेजारी बसून होत्या. घटना रात्री आठच्या सुमारास घडली. परंतु ती चार तासांनी म्हणजे रात्री १२ वाजता उघडकीस आली.