चंद्रपूर : बल्लारपूर पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून दोन ठिकाणी धाड टाकून दोन इसमाकडून १० किलो ४९० ग्राम गांजा जप्त केला. या कारवाईत १ लाख ६४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गांजा तस्करीची सूचना पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांना मिळाली. त्यांनी दोन वेगवेगळे पथक तयार करून सापळा रचला. सरदार पटेल वॉर्ड लालचंद गणेश केसकर रा. सरदार पटेल वार्ड हा रेल्वे गाडीने उतरून गांजा घेऊन पायी जात असताना सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद रासकर, राजेश, प्रवीण, अजय हेडाऊ, संध्या आमटे यांनी त्याची चौकशी केली. त्याच्या जवळून ४ किलो ३०० ग्राम गांजा निघाला.
तर दुसऱ्या घटनेत विठ्ठल वॉर्ड पठाणपुरा चंद्रपूर येथील राजेश मदनलाल जोशी (६५) हा मोटारसायकल क्रमांक एमएच ३४ बीई ४६०९ वर गांजा घेऊन जात असता पोलिसांनी त्याची पेपरमिल कलामंदिर गेटजवळ पकडून चौकशी केली. त्याच्या जवळून ६ किलो १९० ग्राम गांजा मिळून आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक मुलानी यांच्या फिर्यादीवरून केली. सहायक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड यांनी दोघांवर नार्कोटिन्ग ड्रग्स कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला.