Crime News: अकोला पोलिसांकडून अमरावतीत चोरीच्या आरोपीवर फायर, संशयकल्लोळ उठल्याने डीआयजींनी आरंभली चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 11:09 PM2022-08-16T23:09:29+5:302022-08-16T23:09:47+5:30

Crime News: अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन एका आरोपीवर दोन राऊंड फायर केले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला.

Crime News: Akola police fire on theft accused in Amravati, DIG initiates investigation as suspicions arise | Crime News: अकोला पोलिसांकडून अमरावतीत चोरीच्या आरोपीवर फायर, संशयकल्लोळ उठल्याने डीआयजींनी आरंभली चौकशी

Crime News: अकोला पोलिसांकडून अमरावतीत चोरीच्या आरोपीवर फायर, संशयकल्लोळ उठल्याने डीआयजींनी आरंभली चौकशी

Next

अमरावती -  अकोला पोलिसांनी अमरावतीत येऊन एका आरोपीवर दोन राऊंड फायर केले. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगरात १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा थरार घडला. याप्रकरणी अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांनी रात्री १०.१८ च्या सुमारास नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी राजेश राऊत (३१, गजानननगर, डाबकी रोड, अकोला) व पवन काळे (१९, गायत्रीनगर, जुने अकोला) यांना अटक केली.

दरम्यान, हा सर्व घटनाक्रम संशयास्पद वाटल्याने अमरावती परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी अकोल्याचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर हे मंगळवारी अमरावती डीआयजी कार्यालयात पोहोचले. सोबतच अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनादेखील पाचारण करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, आरोपी राजेश राऊत याच्यावर अकोल्याच्या डाबकी रोड ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, तो अमरावतीच्या लक्ष्मीनगरात असल्याची माहिती अकोला पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले हे पोलीस पथकासह सोमवारी लक्ष्मीनगरात पोहोचले. त्यावेळी आरोपी राजेश राऊत हा पवन काळे याच्यासह चारचाकी वाहनात दिसून आला. पोलीस दिसताच तो पळून जाण्याच्या बेतात होता. थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याचे वाहन ढोले व पोलीस चमूच्या अंगावर आणले. दरम्यान, राजेश राऊतचे नियंत्रण सुटून वाहन विजेच्या खांबाला धडकले. पुढे ढोले यांनी स्वत:ची ओळख सांगून त्याला शरण येण्यास सांगितले.

 हा घटनाक्रम संशयास्पद
आरोपी राजेश राऊत हा कारबाहेर आला. त्याने आपल्या तथा सहकाऱ्यांवर देशी कट्टा रोखला. तो पिस्टलमधून फायर करण्याच्या सवयीचा असल्याने आपण त्याच्या वाहनाच्या दिशेने दोन राऊंड फायर केले व त्याला ताब्यात घेतल्याचे ढोले यांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपीकडून गावठी पिस्टल व दोन काडतूस ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सोमवारी सकाळी आरोपींकडून पोलिसांवर फायर झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, घटनेच्या १२ तासांनंतर नोंदविलेल्या तक्रारीत आरोपीने देशी कट्टा रोखल्याचे ढोले यांनी म्हटले आहे. वेळ नसल्याने आपण अमरावती शहर पोलिसांची मदत घेतली नसल्याचे स्पष्टीकरणदेखील देण्यात आल्याने संशय बळावला आहे. अकोल्याच्या अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत या सोमवारी रात्रीच गाडगेनगर पोलीस ठाण्यात डेरेदाखल झाल्या होत्या.
 

Web Title: Crime News: Akola police fire on theft accused in Amravati, DIG initiates investigation as suspicions arise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.