Crime News: अल्पवयीन मुलीवर हात बांधून अत्याचार, काल्हेरमधील घटना, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 09:16 IST2022-08-29T09:15:56+5:302022-08-29T09:16:09+5:30
Crime News: ठाण्यातील एका खासगी क्लासच्या दहावीतील विद्यार्थिनीवर भिवंडीतील काल्हेर भागात एका खाेलीत हात बांधून सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली.

Crime News: अल्पवयीन मुलीवर हात बांधून अत्याचार, काल्हेरमधील घटना, तिघांना अटक
ठाणे : ठाण्यातील एका खासगी क्लासच्या दहावीतील विद्यार्थिनीवर भिवंडीतील काल्हेर भागात एका खाेलीत हात बांधून सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी घडली. तिला मारहाण आणि चावा घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तिघांनाही ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने रविवारी पहाटे ताब्यात घेतले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही आरोपी छोटे-मोठे इव्हेंट करतात. इन्स्टाग्रामवर त्यांची ठाण्यातील १६ वर्षीय मुलीशी वर्षभरापूर्वी ओळख झाली होती. त्याच ओळखीचा फायदा घेत एक जण २६ ऑगस्टला दुपारी तिच्या खासगी क्लासच्या ठिकाणी तिला घेण्यासाठी आला तेथून तिला काल्हेर येथील दुर्गेश पार्क सोसायटीतील एका इमारतीतील खाेलीवर घेऊन गेला. तिथे दुपारी २ ते सायंकाळी ४ या कालावधीत तिघांनी बेडरूमध्ये तिच्यावर लैैंगिक अत्याचार केले. तिने विरोध केला असता दाेन आराेपींनी तिला मारहाण केली, तर दुसऱ्याने तिचा चावा घेतला तसेच याबाबत काेणाकडेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. त्यानंतर काल्हेर येथून तिला ठाण्यातील घरी आणून साेडले.
चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकारामुळे तिला त्रास होऊ लागल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यानंतर तिने २७ ऑगस्टला रात्री चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याबाबत बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमानुसार २८ ऑगस्टला सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा नारपोली पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने वर्ग केला आहे. दरम्यान, शनिवारी पीडित मुलगी तक्रार देण्यासाठी चितळसर पोलीस ठाण्यात आली. त्याच वेळी पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड आणि चितळसरच्या पोलीस निरीक्षक सुलभा पाटील आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
आराेपींना दिले नारपाेली पाेलिसांच्या ताब्यात
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने रविवारी पहाटे दाेघांना ठाण्यातून, तर एकाला काल्हेरमधून अटक केली. त्यांना नारपाेली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पीडित मुलीवर एका सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.