बदल्याची आग! एकतर्फी प्रेमातून अकरावीतील विद्यार्थिनीवर तब्बल 14 वेळा वार; घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 13:04 IST2022-06-01T13:03:18+5:302022-06-01T13:04:22+5:30
Crime News : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अकरावीतील विद्यार्थिनीवर तब्बल 14 वेळा वार केले आहेत.

बदल्याची आग! एकतर्फी प्रेमातून अकरावीतील विद्यार्थिनीवर तब्बल 14 वेळा वार; घटनेने खळबळ
नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अकरावीतील विद्यार्थिनीवर तब्बल 14 वेळा वार केले आहेत. तामिळनाडू राज्याच्या त्रिचीजवळील अंतिकुलम येथे ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत विद्यार्थिनी ही इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत होती. 22 वर्षीय तरुण तिच्यावर प्रेम करत होता. पण तिने त्याचं प्रेम नाकारताच तो संतापला आणि त्याने टोकाचा निर्णय घेतला. तिच्यावर हल्ला करून तो फरार झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, केशवन असं या आरोपी तरुणाचं नाव आहे. तो काही दिवसांपूर्वीच जेलमधून सुटला होता. त्यानंतर त्याने पुन्हा विद्यार्थिनीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. घटनेच्या दिवशी परीक्षा संपल्यानंतर ती आपल्या नातेवाईकाच्या घरी जात होती. दरम्यान, अंतिकुलम रेल्वे पूलाजवळून जात असताना आरोपी केशवन याने तिला अडवलं आणि प्रेमाबद्दल सांगितलं. पण पीडितेनं आरोपीच्या प्रेमाला नकार दिला. यावेळी संतापलेल्या आरोपीने पीडितेला धारदार चाकुने 14 वेळा भोसकलं आणि घटनास्थळावरून पळ काढला.
आरोपीवर आधीच संबंधित मुलीचं अपहरण केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पण तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा पीडित मुलीचा पाठलाग सुरू केला आणि तिच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगितलं. पण तिने नकार देताच आरोपीने तिच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.