सिगारेटच्या एका तुकड्यानं तिघांना जन्मठेप; जोडप्याच्या हत्येचा लेक-जावयानं रचला कट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 14:44 IST2025-03-05T14:43:33+5:302025-03-05T14:44:10+5:30
मुलगी आणि जावई रामकृष्ण आणि लीलाराणी यांच्यावर संपत्ती विकून पैसे देण्यासाठी दबाव आणत होते अशी पोलिसांना माहिती मिळाली.

सिगारेटच्या एका तुकड्यानं तिघांना जन्मठेप; जोडप्याच्या हत्येचा लेक-जावयानं रचला कट
कोलकाता - पश्चिम बंगालच्या हावडा येथे ४ वर्षापूर्वी झालेल्या एका जोडप्याच्या हत्येप्रकरणी कोर्टानं ३ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. डबल मर्डरच्या या गुन्ह्यात आरोपींना पकडण्यापासून ते शिक्षा मिळेपर्यंत सर्व काही सिनेमातील कथेसारखेच आहे. एका सिगारेटच्या तुकड्याने पोलिसांना हत्येच्या गुन्हेगारांपर्यंत पोहचवले. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा कुठलाही ठोस पुरावा हाती नव्हता. सिंगारेटच्या तुकड्यावर मिळालेले फिंगर प्रिंटसह साक्षीदार आणि मोबाईल कॉल रेकॉर्डिंग या खटल्यात महत्त्वाचे पुरावे म्हणून पुढे आले.
मुलगी अन् जावयानं रचला हत्येचा कट
१६ सप्टेंबर २०२० साली परगाना जिल्ह्यातील हावडा येथे रामकृष्ण आणि त्यांची पत्नी लीलाराणी यांची त्यांच्या राहत्या घरी गोळी मारून हत्या करण्यात आली. तपासावेळी जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना २ मृतदेह सापडले. कुठलाही साक्षीदार नाही, सीसीटीव्ही फुटेज नाही केवळ जमिनीवर पडलेले सिगारेटचे काही तुकडे सापडले. पोलिसांनी याच आधारे तपासाला सुरूवात केली. फॉरेन्सिक लॅबमध्ये सिगारेटच्या तुकड्यावरून मिळालेले फिंगर प्रिंट आणि डीएनए सुरक्षित ठेवले गेले. त्यानंतर पोलिसांनी मृत जोडप्याच्या नातेवाईकांची आणि ओळखीच्या लोकांची चौकशी सुरू केली. या तपासात जोडप्याचे त्यांची मुलगी आणि जावयासोबत वाद सुरू असल्याचं कळलं. मुलगी आणि जावई रामकृष्ण आणि लीलाराणी यांच्यावर संपत्ती विकून पैसे देण्यासाठी दबाव आणत होते अशी पोलिसांना माहिती मिळाली.
गुन्हेगाराकडे सापडली कॉल रेकॉर्डिंग
सुरुवातीला सुगावा मिळताच पोलिसांनी मुलगी निवेदिता आणि जावई बंटी यांच्या मोबाईल फोनचे डिटेल्स तपासले आणि कॉल डिटेल्स मिळवले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तपासात अजय दास नावाच्या किलरला ५० हजाराची हत्येची सुपारी दिल्याचं समोर आले. त्यानंतर अजय दासला पकडले. त्याच्या मोबाईलमधून काही कॉल रेकॉर्डिंग सापडले. ही रेकॉर्डिंग अजयने हत्येनंतर सुपारीचे पैसे दिले नाही तर वापरायचे म्हणून केली होती. सिगारेटच्या तुकड्यावरून ते फिंगर प्रिंट्स अजयदासचे असल्याचं उघड झाले. कॉल रेकॉर्डिंगचा आवाजही आरोपींसोबत मॅच झाला.
सासू सासऱ्याने घर विकण्यास दिला नकार
बंटी आणि निवेदिता दोघे ७ लाखांच्या कर्जात बुडाले होते. त्यासाठी दोघांनी जोडप्यावर संपत्ती विकून पैसे देण्यासाठी दबाव बनवला. जोडप्याने त्यास नकार दिला म्हणून दोघांनी हत्येचा कट रचला. त्यासाठी ड्रायव्हर अजय दासला ५० हजारांची सुपारी दिली होती. ज्यावेळी जोडप्याला गोळी मारली तेव्हा जावई बंटी तिथेच होता. अजय दासकडून मिळालेले शस्त्र आणि जोडप्याला लागलेल्या गोळ्या एकाच पिस्तुलच्या असल्याचं तपासात पुढे आले. हे सर्व पुरावे आणि इतर साक्षीदारांसह गुन्हेगारांना कोर्टात हजर केले. त्यानंतर कोर्टाने या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.