Suchna Seth : सूचना सेठ... मानसिक आजार की चलाखी?; कोर्टाने मागितला मेंटल हेल्थ रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2024 18:09 IST2024-01-20T17:33:07+5:302024-01-20T18:09:01+5:30
Suchna Seth : गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलीस मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने सूचनाची चौकशी करत आहेत.

Suchna Seth : सूचना सेठ... मानसिक आजार की चलाखी?; कोर्टाने मागितला मेंटल हेल्थ रिपोर्ट
गोव्यातील चार वर्षांच्या मुलाच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने आरोपी आई सूचना सेठ हिला 12 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने या बारा दिवसांत पोलिसांना सूचना सेठचा मेंटल हेल्थ रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यावेळी पोलिसांनी सूचना सेठ तपासात कोणत्याही प्रकारे सहकार्य करत नसल्याचं सांगितलं.
गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलीस मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने सूचनाची चौकशी करत आहेत. न्यायालयातही तिने बोलण्यास नकार दिला, त्यामुळे पुढील सुनावणीला उपस्थित राहून मेंटल हेल्थ रिपोर्ट सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता सूचना सेठला 31 जानेवारीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गोवा पोलीस सूचना सेठच्या हातून तिच्या चार वर्षाच्या मुलाच्या हत्येच्या प्रकरणाला ओपन अँड शट केस मानत होते. ज्यामध्ये पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या काही तासांतच मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मुलाची आई सूचना सेठ हिला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. मात्र घटना उघड होऊन 11 दिवस उलटून गेले तरी या हत्येबाबत असंख्य प्रश्न उपस्थित होत असल्याचं समोर येत आहे.
2020 मध्ये पती-पत्नीमध्ये भांडणं सुरू झाली. प्रकरण कोर्टात पोहोचल्यावर सूचनाला मुलाचा ताबा मिळाला. तेव्हापासून सूचनाने आपल्या मुलाला पती वेंकटरमन यांना भेटू दिले नाही. वेंकटरमन यांनी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ज्यावर न्यायालयाने नुकतेच आदेश दिले की वेंकटरमन आपल्या मुलाला दर रविवारी भेटू शकतील. पण त्यानंतर सूचनाने धक्कादायक कृत्य केलं आहे.