Congress MP Adhir Ranjan Chowdhury was attacked by miscreants; House staff was also thrashed | अधीर रंजन चौधरींच्या घरावर अज्ञातांचा हल्ला; कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की

अधीर रंजन चौधरींच्या घरावर अज्ञातांचा हल्ला; कर्मचाऱ्यांनाही धक्काबुक्की

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि संसदेमध्ये सत्ताधारी भाजपाला घेरण्यासाठी ओळखले जाणारे काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्या दिल्लीतील घरावर आज अज्ञातांनी हल्ला केला. सायंकाळी 5.30 च्या सुमारास ही घटना घडली.


काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची दोन महिन्य़ांपूर्वीच एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यावेऴी प्रियांका गांधी यांच्या घरी एक स्कॉर्पिओ घुसली होती. यावरून वाद निर्माण झाला होता. आता अधीर रंजन चौधरींच्या घरी अज्ञातांनी घुसखोरी करून कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याने सुरक्षेचा प्रश्न उद्याच्या अधिवेशनाच्या दिवशी उपस्थित होण्याची शक्यता आहे. 


अधीर रंजन हे लोकसभेत सत्ताधारी भाजपाला घेरण्याचे काम करतात. त्यांनी महागाईवरून आणि अर्थव्यवस्था कोलमडल्यावरून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना निर्बला असे हिणवले होते. यावरून संसदेत गदारोळही झाला होता. यावर अधीर रंजन यांनी माफीही मागितली होती. अशा प्रकारे ते नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये करत असल्याने चर्चेत असतात. 


आज दिल्ली हिंसाचारावरून संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. याचवेळी काही अज्ञात हल्लेखोरांनी घरामध्ये घुसखोरी केली. याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून या हल्लेखोरांना अधीर रंजन यांच्याशी फोनवर बोलायचे होते. मात्र, त्यांच्या कर्मचाऱ्यांनी यास नकार दिल्याने त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांना रोखणाऱ्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याचे अधीर रंजन यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

Web Title: Congress MP Adhir Ranjan Chowdhury was attacked by miscreants; House staff was also thrashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.