विमान प्रवासात दारूच्या नशेत प्रवाशांचा गोंधळ; दोघांवर कारवाई, सहार पोलिसांकडून तपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 13:23 IST2023-03-24T13:22:33+5:302023-03-24T13:23:05+5:30
बुधवारी ते दुबई ते मुंबई या विमानामध्ये कर्तव्यास होते.

विमान प्रवासात दारूच्या नशेत प्रवाशांचा गोंधळ; दोघांवर कारवाई, सहार पोलिसांकडून तपास
मुंबई : दुबई ते मुंबई विमान प्रवासात दोन प्रवाशांनी दारूचे सेवन करत विमानात गोंधळ घातल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी सहार पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली. भांडुप परिसरात राहणारे मनदीप सुरेंदर सिंग (२६) हे इंडिगो लिमिटेडमध्ये सिनिअर केबिन क्रू म्हणून कार्यरत आहे.
बुधवारी ते दुबई ते मुंबई या विमानामध्ये कर्तव्यास होते. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण घेतले. यादरम्यान कोणीही विमानात दारूचे सेवन करू नये याबाबत वेळोवेळी घोषणा केली. उड्डाणानंतर सकाळी ८ च्या सुमारास सीट नंबर १८ इ आणि २० बी वरील प्रवासी दारूचे सेवन करताना दिसले.
शेजारील अन्य प्रवाशांनी त्यांना हटकताच एक प्रवासी मागच्या सीटवर जाऊन बसला. तर, दुसरा तेथेच बसून नशा करत होता. त्याला दारू पिण्यास मनाई असून कारवाई करण्यात येईल असे सांगताच, तो जागेवरून उठून विमानातील मोकळ्या जागेत फिरत गोंघळ घालत होता.
परदेशातून वर्षभराने घरी परतत होते
चौकशीत दत्तात्रय आनंद बापर्डेकर (४७) हा कोल्हापूरचा तर जॉन जॉर्ज डिसूजा (४९) हा नालासोपारा येथील रहिवासी असल्याचे समजले. मुंबई विमानतळावर उतरताच दोन्ही प्रवाशांना सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. विमानात दारूचे सेवन करत विमान सुरू असताना रिकाम्या जागेत फिरून विमानातील नियमांचा भंग केला. तसेच, विमानामध्ये गोंधळ घालून विमानातील सर्व प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दोघांना अटक करण्यात आली. दोघेही दुबई येथे नोकरीला आहे. वर्षभराने ते घरी परतत होते.
सातवी घटना
यावर्षी आतापर्यंतची अशाप्रकारे विमानात गोंधळ घालण्याची ही सातवी घटना असल्याची माहिती समोर येत आहे. ११ मार्च रोजी लंडन ते मुंबई प्रवासादरम्यान एका प्रवाशाने धूम्रपान करत थेट आपातकालीन मार्गावरील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये त्याला अटक करण्यात आली.