शिवसेनेच्या नगरसेविकांकड़ून आधी मारहाणनंतर तक्रार; विनयभंगाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:20 AM2020-09-07T00:20:35+5:302020-09-07T00:20:57+5:30

महिला नगरसेवकांविरोधात मारहाणीचा गुन्हा 

Complaint from Shiv Sena corporator after earlier beating | शिवसेनेच्या नगरसेविकांकड़ून आधी मारहाणनंतर तक्रार; विनयभंगाचा आरोप

शिवसेनेच्या नगरसेविकांकड़ून आधी मारहाणनंतर तक्रार; विनयभंगाचा आरोप

Next

मुंबई : भांडुपमध्ये परिसरात धूरफवारणीचे व्हिडीओ करत असलेल्या किरण गायचर या तरुणाला शिवसेनेच्या नगरसेविका, कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. तरुणाने पोलिसात धाव घेताच, त्याच्या विरोधातच मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंदवून, मध्यरात्री रुग्णालयातून थेट त्याला कोठडीत धाडल्याचा प्रकार समोर आला. यात सेनेच्या दीपमाला बढे, दीपाली गोसावीसह अन्य जमावाविरुद्ध मारहाण, आणि बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.               

भांडुपमध्ये कुटुंबीयांसोबत राहणाऱ्या गायचरने गेल्या काही दिवसांपासून फेसबुक लाईव्हमार्फत भांडुपमधील समस्यांना वाचा फोडण्यास सुरुवात केली.  यातच काही दिवसांपूर्वी बढे यांच्या नातेवाइकाचे असलेल्या रुग्णालयाबाबत त्याने फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला. यातील प्रत्यक्षदर्शी रोहित सुर्वेने ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास सेनेच्या कार्यकर्त्याचा कॉल आला आणि गायचोर फेसबुकवर शेअर करत असलेले व्हिडीओ, पोस्टमुळे त्याला मारण्यासाठी शाखेत सगळ्या महिला एकत्र जमल्याचे सांगून, त्याला लपविण्याचा सल्ला दिला. रोहितने गायचरला याबाबत सांगितले.

मात्र आपली चूक नसल्याने का घाबरायचे म्हणत, गायचर सर्वोदय नगर परिसरात फवारणीचे काम करून घेत होता. त्याचे फेसबुक लाईव्ह करत असताना, बढे आणि गोसावी या ४० ते ५० महिला कार्यकर्त्यांसह तेथे धडकल्या. काही कार्यकर्तेही तेथे होते. फेसबुक लाईव्ह सुरू असताना, व्हिडीओ का काढतोस म्हणत सर्वांनी त्याला मारहाण सुरू केली.

तरुणाने पोलिसात धाव घेतली. सुरुवातीला त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. पुढे बढे यांनी हात फ्रॅक्चर झाल्याचे सांगून गायचरविरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंद केला. रात्री गायचरच्या बाजूने बढे, गोसावीसह अन्य महिला, पुरुष कार्यकर्त्यांविरुद्ध मारहाण, बेकायदा जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.         

मध्यरात्रीच रुग्णालयातून अटक

सायन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गायचरला रात्री दोनच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज घेत, थेट अटक दाखवून कोठडीत धाडले.

घटनेची वर्दी मिळताच दोन्ही बाजू ऐकून घेत दोघांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले. तरुण तक्रारीसाठी पुढे येत नव्हता, आम्हीच त्याची बाजू मांडण्यास सांगितल्यानंतर तो तयार झाला. त्यानुसार अधिक तपास सुरु आहे.
- शाम शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भांडुप पोलीस ठाणे 

बढे आणि गोसावी या ४० ते ५० महिला कार्यकर्त्यांसह तेथे धडकल्या. काही कार्यकर्तेही तेथे होते. फेसबुक लाईव्ह सुरू असताना, व्हिडीओ का काढतोस म्हणत सर्वांनी त्याला मारहाण सुरू केली.

Web Title: Complaint from Shiv Sena corporator after earlier beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.