"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 09:09 IST2025-12-12T09:06:43+5:302025-12-12T09:09:15+5:30
घटनेच्या दिवशी, श्रीजलाच्या पालकांनी लग्नाच्या चर्चेसाठी श्रवणला बीरमगुडा येथील त्यांच्या घरी बोलावले. श्रवण घरी येताच..

"घरी ये, लग्नाची बोलणी करू..."; तरुणाला घरी बोलावलं अन् गर्लफ्रेंडच्या कुटुंबाने मिळून संपवलं!
प्रेमसंबंधांना विरोध करणाऱ्या प्रेयसीच्या पालकांनी एका बी.टेक. विद्यार्थ्याला क्रूरपणे मारहाण करून ठार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. 'लग्नाविषयी चर्चा करण्यासाठी घरी ये' असे सांगून त्याला बोलावण्यात आले आणि त्यानंतर कुटुंबाने मिळून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.
नेमकं काय घडले?
ज्योतीश्रवण साई (बी.टेक. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मैसमगुडा येथील सेंट पीटर्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. श्रवणचे १९ वर्षीय श्रीजलासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, श्रीजलाच्या कुटुंबाचा या नात्याला तीव्र विरोध होता आणि त्यांनी श्रवणला यापूर्वीही तिच्यापासून दूर राहण्याची धमकी दिली होती.
घटनेच्या दिवशी, श्रीजलाच्या पालकांनी लग्नाच्या चर्चेसाठी श्रवणला बीरमगुडा येथील त्यांच्या घरी बोलावले. श्रवण घरी येताच, श्रीजलाचे आई-वडील आणि इतर कुटुंबीयांनी त्याच्यावर क्रिकेट बॅटने हल्ला चढवला. या भयंकर मारहाणीत श्रवणच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या, तर त्याचे पाय आणि बरगड्या फ्रॅक्चर झाले.
उपचारादरम्यान मृत्यू
गंभीर जखमी झालेल्या श्रवणला तातडीने कुकटपल्ली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
अमीनपूर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळावरून क्रिकेट बॅटही जप्त करण्यात आली आहे. या हत्येमागे नेमका काय हेतू होता आणि पालकांव्यतिरिक्त आणखी कोणी यात सामील होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.