पैशांसाठी कॉलेज तरुणांनी लुटले वृद्धेला, फिल्मी स्टाइलने लूट, आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:05 IST2025-01-14T11:05:05+5:302025-01-14T11:05:20+5:30

धारावीत राहणाऱ्या निर्मला कोळी (७०) यांच्यावर रविवारी दुपारी घरात घुसून काही तरुण-तरुणींनी हल्ला केला.

College youths rob elderly man for money, film style robbery, eight arrested | पैशांसाठी कॉलेज तरुणांनी लुटले वृद्धेला, फिल्मी स्टाइलने लूट, आठ जणांना अटक

पैशांसाठी कॉलेज तरुणांनी लुटले वृद्धेला, फिल्मी स्टाइलने लूट, आठ जणांना अटक

मुंबई : महागड्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच कर्जाचे हप्ते फेडता यावेत यासाठी आपल्याच परिसरात राहणाऱ्या वृद्धेवर हल्ला करून तिचे दागिने आणि रोख रक्कम, असा दोन लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. हे सर्वजण कॉलेजचे विद्यार्थी असून, त्यातील एक अवघी १७ वर्षांची आहे. 

धारावीत राहणाऱ्या निर्मला कोळी (७०) यांच्यावर रविवारी दुपारी घरात घुसून काही तरुण-तरुणींनी हल्ला केला. त्यांचे हातपाय बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबला. चेहऱ्यावर मिरची पावडर टाकून हातातील व गळ्यातील पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेतले. कपाटातून १४ हजारांची रोकड काढून पळ काढला. महिलेने त्यांच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधला. धारावी पोलिसांनी तपास सुरू केला. कोळी यांच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या प्रगती होलमुगे या तरुणीवर पोलिसांची संशयाची सुई गेली.

पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली. तिनेच मित्र-मैत्रिणींच्या मदतीने गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी प्रगतीसह प्रिया सोनवणे (१८), भावना शेवाळे (२३), निखिल पाटील (२४), प्रसेनजीत करमोकर (२६) साहिल देवकर (२१) आणि सोनार अनिमेश करमोकर (४२) या सगळ्यांना धारावी, मशीद बंदर, कुर्ला आणि मुलुंड या परिसरातून अटक केली. एका १७ वर्षीय मुलीला पकडण्यात आले आहे. 

चार दिवस रेकी, नंतर... 
प्रगती आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना गेल्या काही दिवसांपासून पैशाची आवश्यकता होती. काहींचे बँक हप्तेही थकले होते. यातूनच मार्ग काढण्यासाठी विचार सुरू असतानाच एकट्या राहणाऱ्या कोळी यांच्या अंगावरी दागिने पाहून प्रगतीची नियत फिरली. तिने मित्र-मैत्रिणींना याबाबत सांगितले. त्यांनीही होकार देताच ठरल्याप्रमाणे चार ते पाच दिवस त्यांनी कोळी यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. रविवारी त्या झोपताच त्यांनी चोरी केली. चोरीचे दागिने त्यांनी सराफाला विकले. त्यानुसार पोलिसांनी सराफावर कारवाई केली.

आरोपींना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी कुठलाही गुन्हा नाही. पैशासाठी त्यांनी गुन्हा केला. 
- हर्षराज अळसपुरे, प्र. वरिष्ठ पोलिस निरीक्षक, धारावी पोलिस स्टेशन

Web Title: College youths rob elderly man for money, film style robbery, eight arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.