Chitrakoot Crime: उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ऐशोआरामात जीवन जगण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने एक भयानक कट रचला. चित्रकूटमध्ये राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिक्री अमनजवळ ३० जून रोजी जळालेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात मंगळवारी एक नवीन खुलासा झाला. कार अपघातामध्ये मृत झालेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत सापडल्याने खळबळ उडाली. दोन कोटींच्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आणि ४५ लाखांचे कर्ज न फेडण्यासाठी पती-पत्नीने हा फिल्मी कट रचला होता.
चित्रकूटच्या राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० जून रोजी एका कारमध्ये सापडलेल्या गंभीर जळालेल्या मृतदेहाप्रकरणी आश्चर्यकारक खुलासा झाला. हा मृतदेह रेवा येथील सुनील सिंहचा नसून त्याचा मित्र विनय सिंहचा होता. सुनीलचा पत्नी हेमा सिंहने त्याला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्कार केले होते. मात्र प्रत्यक्षात सुनील सिंह जिवंत होता तर विनय सिंहचा मृत्यू झाला. याप्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सुनीलने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, त्याने कर्ज फेडण्यासाठी आधी २ कोटी रुपयांचा विमा घेतला होता. नंतर तो परत मिळवण्यासाठी विनय सिंहशी मैत्री केली आणि दारूच्या नशेत त्याला बेशुद्ध करुन गाडीत जिवंत जाळले.
दुसरीकडे, कटाचा एक भाग म्हणून हेमा सिंहने तो सुनीलचा मृतदेह असल्याचा दावा केला. सुनीलच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, हेमाला विम्याचे पैसे मिळतील असा त्यांचा प्लॅन होता. यानंतर, सर्व कर्ज फेडल्यानंतर, दोघेही रेवा सोडून दुसरीकडे जाणार होते. हेमा देखील कटाचा एक भाग असल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमा सिंह आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी तो सुनीलचा मृतदेह असल्याचा दावा करून अंत्यसंस्कार केले होते. मात्र पोलिसांना त्यांच्या वागण्यावरुन संशय येत होता. त्यामुळे पोलिसांनी सुनीलच्या मुलाचे डीएनए नमुने घेतले. मात्र डीएनए नमुना जुळल्यामुळे पोलिसांना हा मृतदेह सुनीलचा असल्याचे पटले. घटनास्थळावरून बांगड्या सापडल्यानंतर, हा मृतदेह एखाद्या महिलेचा असू शकतो अशी शंका निर्माण झाली होती.
त्यानंतर रविवारी पोलिसांनी सुनील सिंह याच्या घरातून अटक केली. त्यानंतर सुनीलने सगळा घटनाक्रम सांगितला. सुनीलने सांगितले की त्याने कर्जावर एक हार्वेस्टर खरेदी केला होता आणि त्याच्या पत्नीसाठी ब्युटी पार्लर फ्रँचायझी घेतली होती. यामुळे त्याच्यावर ४० लाखांचे कर्ज होते. यासाठी त्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये २ कोटी रुपयांचा जीवन विमा काढला. ही विमा रक्कम मिळवण्यासाठी त्याने युट्यूबवर अनेक गुन्हेगारीसंदर्भातील सीरिज पाहिल्या. त्यानंतर तो अशा व्यक्तीचा शोध घेऊ लागला ज्याला पत्नी किंवा मुले नाहीत. त्यानंतर महिन्याभरापूर्वी एका दारूच्या दुकानात विनय सिंहला भेटला. विनय सिंह त्याला त्याच्या कटासाठी योग्य पात्र वाटला आणि त्याने त्याच्याशी मैत्री केली. त्यानंतर दोघेही दररोज दारु प्यायला लागले.
त्यानंतर २९ जून रोजी तो विनयला त्याच्या गाडीत घेऊन गेला. वाटेत त्याने त्याला भरपूर दारू पाजली. तो पूर्णपणे मद्यधुंद होऊन बेशुद्ध झाल्यावर सुनीलने राजापूरच्या अमन गावाजवळील एका निर्जन भागात गाडी थांबवली. त्याने गाडीत ठेवलेला सिलेंडर दोन मिनिटांसाठी उघडला. त्यानंतर त्याने त्याच्या अंगावर कापूर टाकला आणि गाडीला आग लावली. काही वेळाने सिलेंडरचाही स्फोट झाला. त्यात विनय सिंह जिवंत जाळला गेला.
विनयच्या मृत्यूची खात्री झाल्यानंत सुनील प्रयागराजला पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडीच्या नंबरच्या आधारे सुनीलच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर हेमा तिथे पोहोचली आणि तिने तो मृतदेह सुनीलचा असल्याचे सांगून तिने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र सुनील जिवंत सापडल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली.