पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 17:37 IST2025-08-03T17:36:53+5:302025-08-03T17:37:59+5:30
अटक टाळण्यासाठी आरोपीने घरात चार धोकादायक कुत्रे पाळले होते.

पोलिस येताच अंगावर कुत्रे सोडायचा; लढवली अशी शक्कल, सट्टा किंग अलगद जाळ्यात अडकला
छत्तीसगडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील जगदलपूरमध्ये एका 'सट्टा किंग'ला पकडण्यासाठी पोलिसांना विशेष रणनीती अवलंबावी लागली. अटक टाळण्यासाठी आरोपी आरोपी सातत्याने पोलिसांवर घरात पाळलेले धोकादायक कुत्रे सोडायचा. मात्र, यावेळी पोलिसांनी डॉग रेस्क्यू टीमसह आरोपीच्या घरावर छापा टाकला आणि आरोपीला बेटिंग स्लिप्स आणि लाखो रुपयांच्या रोख रकमेसह अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, जगदलपूरच्या जवाहर नगर वॉर्डमध्ये राहणाऱ्या बेटिंग बादशाह प्रेम परिहारला पकडण्यासाठी पोलिसांना अनेक महिने कठोर परिश्रम करावे लागले. आरोपीची अनोखी 'डॉग डिफेन्स' रणनीती होती. प्रेम परिहारने त्याच्या घरात चार धोकादायक कुत्रे पाळले होते. पोलिस येताच आरोपी त्यांच्या अंगावर कुत्रे सोडायचा. कुत्र्यांच्या भीतीमुळे कारवाईत अडथळा निर्माण झाला होता.
मात्र, यावेळी पोलिस पूर्ण तयारीने पोहोचले. बोधघाट पोलिस स्टेशनचे प्रभारी लीलाधर यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. त्यांच्यासोबत डॉग वेलफेअर-रेस्क्यू टीम देखील उपस्थित होती. प्रेम परिहार याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकताच चारही कुत्रे पोलिसांवर हल्ला करू लागले. पण, यावेळी बचाव पथकाने जबाबदारी स्वीकारली आणि कुत्र्यांना काबूत आणले.
घराची झडती घेताना लाखो रुपयांच्या सट्टा स्लिप्स आणि एक लाख ३६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळीच अटक केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक महेश्वर नाग म्हणाले की, प्रेम परिहार याच्याविरुद्ध बऱ्याच काळापासून तक्रारी येत होत्या. तो त्याच्या घरातून सट्टा चालवत होता. संबंधित कलमांखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.