ग्राहकांना गंडा, बिल्डर ललित टेकचंदानीला अटक; तळोजे येथील गृहनिर्माण प्रकल्पात फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 08:26 AM2024-03-20T08:26:30+5:302024-03-20T08:26:49+5:30

गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी टेकचंदानी याची नऊ तास चौकशी केली

Cheating customers, builder Lalit Tekchandani arrested; Fraud in a housing project in Taloje | ग्राहकांना गंडा, बिल्डर ललित टेकचंदानीला अटक; तळोजे येथील गृहनिर्माण प्रकल्पात फसवणूक

ग्राहकांना गंडा, बिल्डर ललित टेकचंदानीला अटक; तळोजे येथील गृहनिर्माण प्रकल्पात फसवणूक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नवी मुंबईमधील तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पात सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी विकासक ललित टेकचंदानी याला सोमवारी रात्री उशिरा ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली आहे. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २६ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

ललित टेकचंदानी याच्या सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीने तळोजा येथे एका गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू केले होते. या प्रकल्पात घरे घेऊ इच्छिणाऱ्या १,८०० लोकांकडून एकूण ४०० कोटी रुपये जमा केले होते. मात्र या प्रकल्पाला बराच विलंब झाला. तसेच टेकचंदानी याने लोकांना पैसेही परत केले नाहीत. याउलट सर्वसामान्य लोकांकडून जमा केलेल्या रकमेचा अपहार करत ती वैयक्तिक लाभासाठी वापरल्याचा ठपका ईडीने त्याच्यावर ठेवला आहे. या प्रकल्पात घराचे बुकिंग करत लाखो रुपये गुंतवलेल्या चेंबूर येथील एका रहिवाशाने टेकचंदानी याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गेल्या महिन्यात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी टेकचंदानी याची नऊ तास चौकशी केली व त्यानंतर त्याला अटक केली. 

दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी ललित टेकचंदानी याच्याशी संबंधित मुंबई व लोणावळा येथे तीन ठिकाणी छापेमारी करत ईडीच्या अधिकाऱ्यांनी १३ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तर, त्यापूर्वी ७ फेब्रुवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई व नवी मुंबई येथे छापेमारी करत ललित टेकचंदानी याची ३० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

Web Title: Cheating customers, builder Lalit Tekchandani arrested; Fraud in a housing project in Taloje

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक