बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी २७ आरोपींवर आरोप निश्चित; विशेष न्यायालयाने घेतला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 06:12 IST2026-02-11T06:11:25+5:302026-02-11T06:12:10+5:30
हा फौजदारी खटल्यातील पहिला टप्पा असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाकडून आरोप औपचारिकपणे निश्चित करण्यात येतात.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी २७ आरोपींवर आरोप निश्चित; विशेष न्यायालयाने घेतला निर्णय
मुंबई - माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणी विशेष न्यायालयाने मंगळवारी २७ आरोपींविरोधात मकोका आणि बीएनएसअंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
आरोपींनी दोषी नसल्याचे सांगितल्यानंतर विशेष न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत खुनासह मकोका, शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यातील संबंधित कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार (बीएनएसएस) आरोप निश्चित करणे, हा फौजदारी खटल्यातील पहिला टप्पा असून, उपलब्ध पुराव्यांच्या आधारे न्यायालयाकडून आरोप औपचारिकपणे निश्चित करण्यात येतात.
बाबा सिद्दीकी (६६) यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री वांद्रे (पूर्व) येथील त्यांचा मुलगा झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणात अटक केलेल्या एकूण २७ जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कारागृहात असलेला कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रात फरार आरोपी म्हणून दाखविले आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, दहशत आणि वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने अनमोल बिश्नोईने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला.