Mohali MMS Leak: मोहाली MMS कांडाचे धागेदोरे सैन्यापर्यंत; अरुणाचलप्रदेशमध्ये तैनात जवानाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 18:56 IST2022-09-24T18:55:48+5:302022-09-24T18:56:17+5:30
लष्कर, आसाम आणि अरुणाचल पोलिसांच्या सहकार्याने चंदीगढ विद्यापीठ प्रकरणात एक महत्त्वाचे यश मिळाले आहे, असे पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी ट्विट केले आहे.

Mohali MMS Leak: मोहाली MMS कांडाचे धागेदोरे सैन्यापर्यंत; अरुणाचलप्रदेशमध्ये तैनात जवानाला अटक
चंदीगढ विद्यापीठातील मोहाली एमएमएस कांड प्रकरणी पंजाब पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सैन्य दलातील जवान संजीव सिंग याला अटक केली आहे. मोहाली एमएमएस कांडाचे धागेदोरे सैन्य दलापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील चौथा आरोपी संजीव सिंग याला CJM बोडाली यांनी मोहाली कोर्टात हजर करण्यासाठी ट्रान्झिट रिमान्ड दिली आहे. यानंतर त्याला पंजाबमध्ये आणण्यात आले आहे. संजीवला पोलीस न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.
लष्कर, आसाम आणि अरुणाचल पोलिसांच्या सहकार्याने चंदीगढ विद्यापीठ प्रकरणात एक महत्त्वाचे यश मिळाले आहे, असे पंजाब पोलिसांच्या डीजीपींनी ट्विट केले आहे. संजीव सिंग याला अरुणाचल प्रदेशातील सेला पास येथून अटक करण्यात आली आहे. त्याला मोहाली कोर्टात हजर केले जाईल, असे ते म्हणाले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी एमबीएच्या विद्यार्थिनीसह तीन आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे. एमबीएची विद्यार्थिनी, तिचा प्रियकर सनी मेहता आणि तिचा मित्र रंकज वर्मा या तिन्ही आरोपींच्या प्राथमिक चौकशीत पोलिसांना अनेक तथ्य मिळाले आहेत. त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममधून इतर मुलींचे व्हिडिओ बनवल्याचा आरोप या एमबीएच्या विद्यार्थीनीवर आहे. हे व्हिडिओ ती तिच्या दोन मित्रांसोबत शेअर करायची. गर्ल्स हॉस्टेलमध्ये एमबीएची एक विद्यार्थिनी व्हिडिओ बनवत असताना तिला 6 मुलींनी पाहिले आणि या प्रकरणाची भांडाफोड झाली.
हे प्रकरण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयातही पोहोचले आहे. उच्च न्यायालयाच्या वकिलाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. या याचिकेवर लवकरच हायकोर्टात सुनावणी होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा जेणेकरून सत्य बाहेर येईल, असे या याचिकेत म्हटले आहे.